पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडी होण्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आघाडी करण्याबाबत आज (दि. ५) मुंबईत बैठक होणार होती, परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही बैठक आज होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू असलेल्या चर्चेच्या वृत्ताला त्यांनी यावेळी दुजोरा दिला.
आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत लपवालपवी करण्याचे काहीही कारण नाही. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज (दि. ५) बैठक होणार नाही. आघाडी करण्याबाबत सकारात्मक वातावरण आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. त्याबाबत चर्चा सुरू आहे. एकदा आघाडी करण्याचे जाहीर घोषणा झाल्यानंतर त्यात कोणतीही लपवाछपवी करण्याचे काहीही कारण नाही, असेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी होणार असल्याची घोषणा वंचितकडून करण्यात आली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आज (दि. ५) पहिली बैठक होणार होती. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आज दुपारी मुंबईत होणार होती. परंतु ही बैठक आज होणार नसल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती करण्याआधी महाविकास आघाडीमध्ये वंचितचे कोणते स्थान असेल, याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे. आता यावर ठाकरे गट आता कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे आंबेडकर आणि ठाकरे यांच्या आघाडीची चर्चा सुरू असताना शिंदे गटही आंबेडकर यांना आपल्या गोटात आणण्यास उत्सुक आहे. याबाबत शिंदे गटातून प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
तर वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येणार असेल, तर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेणार हेही पाहावे लागणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनीही अनुकूलता दर्शवली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रवादी संदर्भातील चर्चेला फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आंबेडकर यांच्या बैठकीत महाविकास आघाडीबाबत काय चर्चा होणार ? याची औत्सुकता राजकीय वर्तुळात राहणार आहे.
हेही वाचलंत का ?