Latest

देशातील सर्व बोर्डांचे मूल्यमापन समान पातळीवर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीच्या परीक्षा घेणारे देशभरात 60 हून अधिक बोर्ड आहेत. या बोर्डांना 'परफॉर्मन्स असेसमेंट अ‍ॅनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट' अर्थात 'परख'च्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर आणून त्यांची मूल्यमापन पद्धती समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, यापुढील काळात केवळ विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता तपासण्यावर अधिक भर दिला जाणार आहे, अशी माहिती 'एनसीईआरटी'च्या प्राध्यापिका रंजना अरोरा यांनी दिली.

पुण्यातील पत्रकारांनी दिल्लीतील एनसीईआरटीच्या मुख्य कार्यालयात जाऊन एनसीईआरटीच्या शैक्षणिक कामांची, तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली. या वेळी रंजना अरोरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सीबीएसई, आयसीएसई, आयबी यांसह प्रत्येक राज्यांमधील बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. सद्य:स्थितीत या बोर्डाच्या मूल्यमापनात व प्रश्नपत्रिकेत कोणतेही साम्य नाही.

प्रत्येक बोर्ड आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करीत आहे. परंतु, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रथमच देशभरातील सर्व बोर्डांच्या परीक्षा व मूल्यमापनाबाबत विचार होत आहे. त्यासाठी परख या प्लॅटफॉर्मवर सर्व बोर्डांना एकत्र आणले जाणार आहे. अरोरा म्हणाल्या, की देशभरातील सर्व बोर्डांना एका व्यासपीठावर आणून परीक्षांमध्ये समानता आणणे, हे एक आव्हानच आहे. पण, त्याकडे संधी म्हणून पाहता येऊ शकते. यामुळे सर्वच मुलांचा फायदा होणार आहे.

मूल्यमापनाबरोबरच प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांमध्येही बदल करण्याचा विचार सुरू आहे. यापुढे प्रश्नपत्रिकातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या क्षमता तपासण्यावर भर असेल. सोशल इमोशन डेव्हलपमेंट, सायको मोटिव्ह डेव्हलपमेंट, कल्चर डेव्हलपमेंट आदींबाबत विचार करण्यात येत आहे. प्रश्नांबरोबरच विविध सराव किंवा अ‍ॅक्टिव्हिटीसुद्धा विद्यार्थ्यांच्या क्षमतांची चाचणी करणार्‍याच असतील.

शाळासिद्धीबाबत विद्या प्राधिकरणाला कळवणार

देशात शाळांचा दर्जा विद्यार्थी, पालकांना समजावा, यासाठी शाळासिध्दी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परंतु, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांचे केवळ स्वयंमूल्यमापन करण्यात येत आहे. परंतु, शाळांचे बाह्यमूल्यमापन झालेले नाही. यासंदर्भात एनसीईआरटीच्या अधिकार्‍यांना विचारले असता, त्यांनी शाळांच्या बाह्यमूल्यमापनाबाबत विद्या प्राधिकरणाला निर्देश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अभ्यासक्रम वगळलाच नाही…

एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून डार्वीनचा सिध्दांत किंवा मोगलांचा इतिहास वगळला जात असल्याच्या आरोपाचे एनसीईआरटीच्या अधिकार्‍यांनी खंडन केले आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार एखादा पाठ्यक्रम जर वारंवार विविध इयत्तांमध्ये येत असेल, तर तो ठराविक इयत्तेत ठेवून अन्य इयत्तांमधून कमी करण्यात आला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT