Latest

विमान प्रवासात AIIMS डॉक्टरांची कमाल! २ वर्षांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करून दिले जीवदान

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विमानात प्रवास करत असलेल्या डॉक्टरांनी एका २ वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दारातून परत आणून जीवदान दिले. बंगळूरवरून दिल्लीला जाणार्‍या विमानात ही आश्चर्यकारक घटना घडली. रविवारी संध्याकाळी २ वर्षांच्या मुलीची अचानक तब्येत बिघडल्यानंतर विमानात प्रवास करत असलेल्या ५ डॉक्टरांनी एक लहान आणि यशस्वी शस्त्रक्रिया करून मुलीला नवीन जीवदान दिले. एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांच्या कर्तव्यदक्षतेमुळे २ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले आहेत. यामुळे या डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे.

माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी बंगळूर येथून दिल्लीसाठी उड्डाण घेतलेल्या विस्ताराच्या यूके-८१४ विमानात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. एका २ वर्षांची मुलगी जी सियानोटिक आजाराने ग्रस्त आहे; ती बेशुद्ध असल्याचे सांगण्यात आले. यानंतर मदतीसाठी विमानातून प्रवास करत असलेले एम्सचे डॉक्टर पुढे आले. डॉक्टरांनी मुलीला सीपीआर दिला आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा वापर करुन तिच्यावर उपचार केले.

दरम्यान, उपचारादरम्यान मुलीला कार्डियाक अरेस्ट येऊन तिच्या जिवाला धोका निर्माण झाला. त्यानंतर एईडीचा वापर करण्यात आला. या दरम्यान सुमारे ४५ मिनिटे डॉक्टरांनी मुलीवर उपचार केले आणि उपचारानंतर विमानाला नागपूरला पाठवण्यात आले. येथे तिला पुढील उपचारासाठी बालरोगतज्ज्ञांकडे सोपवण्यात आले. आता मुलीची प्रृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

एम्सच्या (AIIMS) पाच डॉक्टरांमध्ये ॲनेस्थेसिया विभागाचे डॉ. नवदीप कौर, एसआर कार्डियाक रेडिओलॉजी डॉ. दमनदीप सिंह, माजी एसआर एम्स रेडिओलॉजी डॉ. ऋषभ जैन, माजी एसआर एम्स एसआर ओबीजी डॉ. ओइशिका आणि एसआर कार्डियाक रेडिओलॉजी डॉ. अविचला टॅक्सक यांचा समावेश होता.

काय आहे सियानोटिक आजार?

सियानोटिक आजारात रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. यामुळे त्वचा निळ्या रंगाची पडते. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. बहुतेकदा हा रोग फॅमिली हिस्ट्री आणि गर्भधारणेदरम्यान झालेल्या कोणत्यातरी विषाणूजन्य संसर्गामुळे बाळाला होतो.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT