करंजी (नगर ): पुढारी वृत्तसेवा : नगर-पाथर्डी रस्त्यावरील करंजी गावाजवळील अपूर्वा पेट्रोल पंपाजवळ बुधवारी दुपारी तीन वाजता एसटी बस आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोटरसायकलवरील माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला.
भारत लक्ष्मण पागिरे (रा आगडगाव, ता.नगर, हल्ली रा. भिंगार) असे मृताचे नाव आहे. बुधवारी दुपारी पागिरे हे करंजी येथून कासारवाडी, कासार पिंपळगाव येथे नातेवाईकाकडे गेले होते.
तेथून परत करंजीकडे येत असताना करंजी गावाजवळील अपूर्व पेट्रोल पंपासमोर भिवंडी-गेवराई या एसटी बसची आणि पागिरे यांच्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पागिरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर एसटी बसचालक तिथून पसार झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर महामार्ग पोलिस पथक, तसेच करंजी दूरक्षेत्राचे हवालदार हरिभाऊ दळवी, लाड घटनास्थळी दाखल झाले. पागिरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना करण्यात आला. मयत पागिरे हे दगडवाडीचे जावई असल्याची माहिती मिळाली.
माणुसकी हरवली
अपघातानंतर मृतदेहाचे मोबाईलमध्ये फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी घटनास्थळी गर्दी झाली होती. अर्धा तास रस्त्याच्या कडेला पडलेल्या या मृतदेहावर कोणीही कपडा टाकण्याची माणुसकी दाखविली नाही.
हेही वाचा :