तिरुवनंतपूरम; पुढारी ऑनलाईन : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील दोन फार्ममध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हर (African swine fever) विषाणू आढळून आला आहे. भोपाळमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेसमध्ये नमुने तपासल्यानंतर येथील फार्ममधील डुकरांमध्ये या रोगाची पुष्टी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका फार्ममधील डुकरांचा मृत्यू झाल्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामुळे दुसऱ्या एका फार्ममधील ३०० डुकरांना मारण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. जुलैच्या सुरुवातीला उत्तराखंडमध्ये आफ्रिकन स्वाइन फीव्हरचे रुग्ण आढळून आले होते.
आफ्रिकन स्वाईन फिव्हरमुळे डुकरांना ताप, मळमळ आणि डायरिया अशी लक्षणे दिसून येतात. हा रोग अत्यंत संसर्गजन्य आहे आणि त्यावर कोणतीही लस नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकांना डुकराचे मांस खाणे टाळावे असे आवाहन केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आसाम, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांत आफ्रिकन स्वाईन फिव्हर विषाणू आढळून आला होता. आफ्रिकन स्वाइन फिव्हर जगभरात पसरत आहे. जागतिक स्तरावर २००५ पासून हा फिव्हर एकूण ७३ देशांमध्ये आढळून आला आहे.
याआधी त्रिपुरामध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरनं संक्रमित झालेल्या १०० हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला होता. यामुळे डुकरांना मारण्याचा निर्णय त्रिपुराच्या पशु संर्वधन विभागाने घेतला होता.
आफ्रिकन स्वाईन फिव्हर (African swine fever) हा जंगली आणि पाळीव डुकरांमध्ये एक अत्यंत वेगाने संक्रमित होणारा विषाणूजन्य रोग आहे. ज्याचा मृत्यू दर १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. हा मानवी आरोग्यासाठी धोक्याचा नाही. परंतु डुकरांच्या संख्येवर आणि शेतीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होतो. हा विषाणू कपडे, बूट, चाके आणि इतर सामग्रीवर जिवंत राहू शकतो. हॅम, सॉसेज आदी डुकराच्या मांसापासून तयार होणाऱ्या उत्पादनांवरदेखील हा विषाणू जिवंत राहू शकतो.
आफ्रिकन स्वाईन फिव्हरवर अद्याप कोणतीही प्रभावी लस उपलब्ध नाही. हा संक्रमित प्राण्यांच्या शरिरातून द्रव पदार्थांच्या माध्यमातून संपर्कात आल्यावर पसरतो. शरिरातून खाद्य मिळवणाऱ्या किटकांच्या माध्यमातूनही त्याचा फैलाव होतो. मनुष्यदेखील याच्या फैलावाचे माध्यम बनू शकतो.
African swine fever जगभरात फैलावत आहे. यामुळे डुकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या फिव्हरचा प्रादुर्भाव आशिया, कॅरेबिया, युरोप आणि प्रशांत महासागर क्षेत्रात झाला आहे. पाळीव तसेच जंगली डुकरे यामुळे बाधित होत आहेत. आफ्रिकेत १९०० च्या सुरुवातीस हा विषाणू प्रथम आढळून आला होता. आता आशिया आणि युरोपीय देशांमध्ये पसरला आहे.