Latest

Aditya-L1 Mission Updates | आदित्य L1 बाबत मोठी अपडेट; लवकरच पोहचणार ‘लॅगरेंज पॉईंट L1’वर, इस्रो अध्यक्षांची माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची सूर्यमोहिमेतील अंतराळयान आदित्य-L1 हे सध्या त्याच्या मार्गावर आहे. दरम्यान हे यान अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते 'लॅगरेंज पॉईंट L1'  या लक्ष्यावर पोहचेल, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी स्पष्ट केले आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे साउंडिंग रॉकेट प्रक्षेपणाच्या ६० व्या वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमादरम्यान पीटीआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (Aditya-L1 Mission Updates)

ISRO चे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, आदित्य L1 अंतराळयान, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली अंतराळ आधारित मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. आदित्य-L1 हे अंतराळयान 'लॅगरेंज पॉईंट L1' वर पोहचेल. पुढच्या वर्षी ७ जानेवारी २०२४ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे देखील एस. सोमनाथ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. (Aditya-L1 Mission Updates)

Aditya-L1 Mission Updates : काय आहे मोहिम 'आदित्य-L1' मोहिम

भारताचे सूर्यमोहिम अंतराळयान 'आदित्य L1' या मोहिमेचे प्रक्षेपण २ सप्टेंबर रोजी झाले. या मोहिमेत हे यान सुमारे १५ लाख किलोमीटर अंतर कापणार आहे. प्रक्षेपणानंतर १२५ दिवसांत यान सूर्याच्या सर्वात जवळच्या 'लॅगरेंज पॉईंट L1' बिंदूवर पोहोचेल. त्यानंतर याठिकाणी हे स्पेसक्राफ्ट स्थिरावणार आहे. तसेच पुढे 'आदित्य L1' अंतराळयान सूर्याची छायाचित्रे घेईल आणि पृथ्वीवर पाठवेल. दरम्यान सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेला लिंग्रज पॉईंट एल-१ हा या मोहिमेतील अंतिम टप्पा आहे.

सूर्यमोहिमेतून अनेक रहस्ये उलगडणार

या मोहिमेच्या माध्यमातून 'इस्रो' सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करणे 'इस्रो'ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास 'आदित्य एल-1' करणार आहे. याशिवाय सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल देखील माहिती मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

'आदित्य एल-1'चा कालावधी पाच वर्षे

'आदित्य एल-1'चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्‍या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. 'चांद्रयान-3'प्रमाणेच 'आदित्य एल-1' सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्‍या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून 'एल-1' पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्‍या मारताना 'आदित्य एल-1' सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल, असेही इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT