नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: अदानी – हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल झाली असून, काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर 17 फेब्रुवारीला सुनावणी घेतली जाणार असल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या विद्यमान न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली अदानी उद्योग समुहाच्या कारभाराची चैकशी केली जावी, अशी विनंती जया ठाकूर यांनी याचिकेत केली आहे. अमेरिकेची शॉर्ट सेलिंग संस्था हिंडेनबर्गने गेल्या 24 जानेवारी रोजी अदानी उद्योग समुहावर समभागांत फेरफार केल्याचा, तसेच कंपन्यांच्या ताळेबंदात गडबड असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर उद्योग-व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. तर संसदेतही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले होते.
जया ठाकूर यांची याचिका दाखल करुन घेतल्यानंतर त्यावर 24 फेब्रुवारीला सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आधी सांगितले. मात्र अन्य दोन याचिकांसोबतच ही याचिका सुनावणीस घेतली जाईल, असे नंतर स्पष्ट न्यायालयाने स्पष्ट केले. अदानीच्या समभागांची एफपीओद्वारे विक्री केली जात असताना एलआयसी तसेच स्टेट बँकेने हे समभाग बाजारभावाच्या तुलनेत जास्त दराने घेतल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करावी, असेही ठाकूर यांनी याचिकेत नमूद केले आहे. अदानी – हिंडेनबर्ग प्रकरणात आधी दाखल असलेल्या याचिकांवर गेल्या सोमवारी सुनावणी झाली होती. त्यावेळी या प्रकरणाची तज्ज्ञामार्फत चौकशी करण्यास तयार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.