Latest

‘गाथा नवनाथांची’ कलाकारांनी घेतलं श्रीक्षेत्र नरसोबाची वाडीचे दर्शन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरत आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले आहे. अनेक यशस्वी भागांनंतरही 'गाथा नवनाथांची' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. आता मालिकेत नागनाथ आणि गुरुआई यांच्यातील युद्ध पाहायला मिळते आहे.

संबंधित बातम्या 

२५ नोव्हेंबर रोजी गोरक्षनाथ यांचा प्रकटदिन आहे. या निमित्ताने मालिकेतील कलाकार जयेश शेवाळकर आणि नकुल घाणेकर यांनी श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी येथील देवस्थानात जाऊन दर्शन घेतले. याबरोबरच मंदिरात त्यांनी पूजाही केली. जयेश शेवाळकर आणि नकुल घाणेकर दोघांनीही दर्शनाचा लाभ घेतला. जयेश शेवाळकर मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत आणि तर नकुल घाणेकर गोरक्षनाथ आणि महादेव यांच्या भूमिकांत मालिकेतून आपल्या भेटीस येत असतात.

गाथा नवनाथांची मालिका आता लवकरच ८०० भागांचा टप्पा पूर्ण करणार आहे. गोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त जयेश शेवळकर आणि नकुल घाणेकर यांनी नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेत पूजा आणि अभिषेक केला. मंदिरात कलाकारांना बघताच भाविकांनी गर्दी केली. मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या भूमिकेत हे कलाकार नेहमीच मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. आज प्रत्यक्षात समोर पाहून भाविकांना मोह आवरला नाही. कित्येक भाविकांनी चक्क कलाकारांच्या पाय पडून नमन केले. कलाकारांना मिळालेले प्रेम पाहून तेही भावुक झाले. यामुळे 'गाथा नवनाथांची' .या मालिकेसाठी चाहत्यांची उत्सकता वाढली आहे.

SCROLL FOR NEXT