Latest

OBC Agitation: राज्यभरातील ओबीसींचे आंदोलन मागे; बबनराव तायवाडे यांची घोषणा

अविनाश सुतार

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा: ओबीसी समाजाच्या विविध २२ मागण्यांवर राज्य सरकराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज्यभरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सुरू असलेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी चंद्रपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. (OBC Agitation)

11 सप्टेंबरपासून राज्यभरात ओबीसीमधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय सर्वे व्हावा. व ओबीसी मुलामुलींचे वसतीगृह सुरू करून स्वाधार योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर अन्नत्याग, साखळी उपोषण सुरू करण्यात आले. सरकार ओबीसींच्या मागण्यांकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतली होती. (OBC Agitation)

शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी सरकारने राज्यभरातील ओबीसी बांधवांच्या मागण्यांवर सकारात्क प्रतिसाद देऊन निर्णय घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आज शनिवारी सर्वप्रथम चंद्रपुरातून २२ दिवसांपासून सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाधक्ष रविंद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सांगता करण्यात आली.

त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी राज्यभरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सुरू असलेले अन्नत्याग व साखळी उपोषण मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा केली. ते म्हणाले की, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकारकडे ओबीसी समाजाच्या मागण्या मांडल्या. आणि त्या सर्व मागण्यांवर शुक्रवारी सविस्तर चर्चा झाली. ओबीसींच्या मागण्या मान्य करण्याचे ठोस सकारात्मक आश्वासन दिल्याने महासंघाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. नागपूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी संघाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. आज चंद्रपुरातून आंदोलन मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता नागपूर मधील आंदोलन मागे घेण्यात येणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT