Latest

अब्दुल सत्तारांना धुळ्यात पाय ठेऊ देणार नाही ; शिवसैनिक आक्रमक

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे बंडखोर मंत्री आणि आमदार यांच्या विरोधात धुळे जिल्हा शिवसेनेने आज पुन्हा मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान शिवसेनेच्या फलकावर धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाला काळे फासण्यात आले. बंडखोर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर यावेळी गंभीर आरोप करण्यात आले. तर सत्तार यांना धुळ्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे पडसाद धुळे जिल्ह्यात उमटत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सलग शिवसेनेने आंदोलन करणे सुरूच ठेवले आहे. आज चाळीसगाव चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पुन्हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला आघाडीची लक्षणीय उपस्थिती होती. तर पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत बंडखोरांचा निषेध केला.

या मोर्चात माजी महापौर भगवान करनकाळ, महानगर प्रमुख मनोज मोरे, माजी महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी व महेश मिस्त्री तसेच भरत मोरे, डॉक्टर सुशिल महाजन, राजेश पटवारी, भूपेंद्र लहामगे, चंद्रकांत गुरव, संजय गुजराथी, प्रशांत श्रीखंडे, विनोद जगताप, राजेश पटवारी, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे पदाधिकारी किरण जोंधळे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केला. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात शिवसेनेला संपवण्याचे काम केले. त्यांनी अर्थपूर्ण व्यवहार असलेल्या कामांना पसंती दिली. तर शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विकासाच्या कामात त्यांनी सहकार्य केले नसल्याचा खळबळजनक आरोप केला. यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांना धुळ्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा किरण जोंधळे यांनी दिला आहे.

पिंजऱ्यात कुत्रा ठेऊन निषेध 

यावेळी पिंजऱ्यामध्ये कुत्र्याला आणण्यात आले व बंडखोरांचा निषेध नोंदवण्यात आला. प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. बंडोखोरांविरोधात घोषणा देऊन रोष व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT