Latest

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात, प्रभागनिहाय पाहणी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक दाखल झाले असून, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण केंद्र, शाळा, उद्याने, वाहतूक बेटे, पथदीप, फूटपाथ आदींसह शहरातील प्रभागनिहाय स्वच्छतेची पाहणी या पथकामार्फत केली जात आहे. येत्या दोन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून पथकामार्फत केंद्राला अहवाल सादर केला जाणार आहे. प्रशासकीय सेवेत राज्यात नाशिकने पहिला क्रमांक पटकाविल्यानंतर देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दर्जा मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिककरांच्या या स्वप्नपूर्तीचे भवितव्य या सर्वेक्षणाच्या निकालावरच अवलंबून असल्याने महापालिका अधिकाऱ्यांची धडधड वाढली आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशपातळीवर स्वच्छ शहरांची यादी दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. 'स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक'ची बिरुदावली मिरविणाऱ्या नाशिक शहराचा समावेश या सर्वेक्षणातून देशातील पहिल्या 10 स्वच्छ शहरांच्या यादीत व्हावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत. मात्र गेल्या सात वर्षांत नाशिकची सातत्याने पिछेहाट होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचे यंदाचे आठवे वर्ष आहे. या स्पर्धेंतर्गत साधारणत: दरवर्षी जानेवारी महिन्यात केंद्राच्या पथकामार्फत स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. मात्र कोरोना काळानंतर हे सर्वेक्षण सातत्याने लांबत आहे. यंदा तर तब्बल आठ महिन्यांच्या विलंबानंतर केंद्राचे पथक सर्वेक्षणासाठी नाशकात दाखल झाले आहे. या पथकामार्फत गेल्या आठवडाभरापासून शहरातील महापालिकेच्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या जात असून, प्रभागनिहाय स्वच्छतेची पाहणी केली जात आहे. येत्या दोन दिवसांत या सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण होणार असून पथक रवाना होणार आहे. या पथकामार्फत केंद्राला अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर कचरामुक्त शहर व हागणदारीमुक्त शहर या स्पर्धेसाठी केंद्राच्या पथकांमार्फत शहरात पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर अंतिमत: निकाल जाहीर केला जाईल.

सर्वेक्षणांतर्गत पथकाकडून या बाबींची तपासणी

– ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण, संकलन व विल्हेवाट.

– निवासी व व्यावसायिक क्षेत्रातील स्वच्छतेची स्थिती.

– सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील स्वच्छता.

– प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी.

– पावसाळी व भूमिगत गटारींची स्थिती.

– मलनिस्सारण केंद्रांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया.

– नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे.

– टाकाऊ बांधकाम साहित्याची विल्हेवाट.

– फूटपाथ, दुभाजक, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण.

– भित्तिचित्रांद्वारे स्वच्छताविषयक जनजागृती.

– शाळा, उद्यानांमधील स्वच्छता.

——

असे आहेत गुण

– सर्व्हीस लेव्हल प्रोग्राम- ४५२५

– सिटिझन फीडबॅक- २,४७५

– प्रमाणपत्र- २५००

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात दाखल झाले आहे. या पथकामार्फत गेल्या आठवडाभरापासून नाशकात विविध ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली जात आहे. येत्या दोन दिवसांत सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल.

– डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT