Latest

देशात एकच दस्तनोंदणी प्रणाली ; सध्या 17 राज्यांमध्ये कार्यरत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्तांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी सुरू केलेल्या 'आय -सरिता' या संगणक प्रणालीची दखल केंद्र शासनाने घेतली असून, देशपातळीवर एकच संगणक प्रणाली असावी, यासाठी सर्व राज्यात 'आय-सरिता' प्रणालीच्या धर्तीवर राष्ट्रीय जेनेरिक दस्ताऐवज नोंदणी प्रणाली (एनजीडीआरएस) या नावाने दस्तनोंदणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सध्या 17 राज्यांमध्ये ही संगणक प्रणाली राबविली जात आहे.

राज्य शासनाने दस्त नोंदणीतील गतिमानता यावी तसेच ती पारदर्शक पद्धतीने राबविली जावी यासाठी मागील काही वर्षांपूर्वी 'आय-सरिता' ही प्रणाली सुरू करण्यात आली. देशात पहिल्यांदा राज्यात हा प्रयोग राबविण्यात आला. नोंदणी व मुद्रांक शुल्कचा कायदा (स्टॅम्प रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट) देशातील सर्व राज्यांमध्ये एक सारखाच आहे. त्यामुळे दस्तांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी एकच संगणक प्रणाली असावी, यासाठी केंद्र शासनाने मागील काही वर्षांपूर्वी देशातील सर्व राज्यांतील नोंदणी महानिरीक्षकांची बैठक घेतली होती. या बैठकीत प्रत्येक राज्यातील दस्तनोंदणी पद्धतीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील 'आय-सरिता' प्रणालीची माहिती घेतली. त्यामध्ये काही सुधारणा करून देशभरात ही प्रणाली राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी केंद्र शासनाने एक समिती नेमली होती. सध्या राज्यात असलेल्या प्रणालीमध्ये काही बदल करून ती अधिक ती गतिमान करण्यात आली आहे. दस्तनोंदणी झाल्यानंतर इंडेक्स टू हा मराठी अथवा इंग्रजी भाषेमध्ये तयार होतो. त्यात आता अनेक भाषेचे पर्याय देण्यात आले आहेत. ही प्रणाली तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने 2002 पासून दस्त नोंदणीसाठी संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. त्यानंतर 2012 पासून संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणाली मध्यवर्ती पध्दतीने आय-सरिता या संगणक प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. तसेच ई-पेमेंट व ई -सर्च यासारख्या विविध ई उपक्रमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT