Latest

सांगली : माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्याप्रकरणी दोघावर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

जत; पुढारी वृत्तसेवा : जतचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (वय ४२) यांच्यावर गोळीबार करत व दगडाने ठेचून हत्या करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री उशिरा मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. ताड यांच्यावर शनिवारी सकाळी नऊ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ताड यांच्या हत्याप्रकरणी जत पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद विक्रम शिवाजीराव ताड यांनी जत पोलिसात दिली आहे.

याप्रकरणी संदीप उर्फ बबलू शंकर चव्हाण व त्यांचे अन्य साथीदार यांच्यावर बेकायदेशीर विनापरवाना शस्त्राचा वापर करणे व हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

ताड यांचा खून कोणत्या कारणातून झाला आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु, आर्थिक देवाणघेवाण, प्लॉटिंग व्यवसाय व अन्य काही कारणावरून खून झाला आहे का? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. याचा तपास पोलीस कसून करत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची कार्यवाही कराव्यात अशा सूचना जत पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

सुरुवातीस संशयित आरोपी म्हणून संदीप उर्फ बबलू चव्हाण यांच्यावर संशयाची सुई होती. दरम्यान, शनिवारी सकाळी मयत विजय ताड यांचे मोठे बंधू विक्रम ताड यांनी फिर्यादीत संदीप उर्फ बबलू चव्हाण व अन्य साथीदाराने गोळ्या झाडून व दगडाने ठेचून हत्या केल्याचे म्हटले आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून संदीप उर्फ बबलू चव्हाण हा शाळा परिसरात वावरत असल्याचे ताड यांनी म्हटले आहे. यामुळे संशयित आरोपी चव्हाण यांनी पाळत ठेवून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा खून कोणत्या कारणातून केला आहे, याची स्पष्टता फिर्यादीत दिली नाही. संशयित आरोपी चव्हाण यांना अटक केल्यानंतर आज खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे.

फिर्यादीत, माजी नगरसेवकाचा उल्लेख

विजय ताड नगरसेवक असताना एका नगरसेवकाने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली होती, असे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे विजय ताड आणि एका माजी नगरसेवकात राजकीय संघर्ष सुरू होता हे समोर आले आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जत पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या अटकेनंतरच या हत्येच्या उलगडा होणार आहे.

पोलिसांसमोर आव्हान

एका आठवड्यात जत तालुक्यात तीन खून झाले आहेत. यातील विजय ताड यांच्या खून केलेले आरोपी अद्याप सापडले नाहीत. परिणामी जत तालुक्यात वातावरण तणावपूर्ण बनले आहे. तपासात वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. पोलीस कॉल डिटेल्स, सीडीआर रिपोर्ट या माध्यमातून माहिती घेत आहेत. घटनास्थळाच्या श्वान पथक, बीडीएस पथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅब, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक यांच्यामार्फत महत्वाच्या बाबी तपासण्यात येत आहेत. घटनास्थळी बंदुकीच्या पुंगळ्या, दगड आढळून आला आहे. आरोपींना अटक करणे, खूनाचे कारण शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

बबलू चव्हाण रेकॉर्डवरील गुन्हेगार

ताड हत्या प्रकरणातील बबलू चव्हाण यांच्यावर यापूर्वी बेकायदेशीर जमाव जमवणे, मारामारी करणे, धमकी देणे, यासारखे गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपी बबलू याचे अन्य साथीदार किती आहेत. हे आरोपीच्या अटके नंतरच स्पष्ट होणार आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT