Latest

कोल्‍हापूर : ऑनलाईन ट्रेंडीगच्‍या नावाखाली बेकरी व्‍यावसायिकाला २० लाखांचा गंडा

अमृता चौगुले

कोल्‍हापूर; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटच्‍या ऑनलाईन ट्रेडिंगमधून आकर्षक परतावा देण्‍याच्‍या अमिषाने मलेशियास्‍थित महिलेने बेकरी व्‍यावसायिकाला २० लाखांचा गंडा घातला. मार्च ते जून २०२२ या कालावधीत ही रक्‍कम संबधित रिका लिम (मलेशिया) हिने सांगितलेल्‍या खात्‍यावर पाठविण्‍यात आली होती. मात्र, ही वेबसाईट अचानक बंद झाल्‍याने २० लाखांची फसवणूक झाल्‍याची फिर्याद उदय विठ्ठल माळी (वय ५०, रा. टाकाळा मेन रोड) यांनी राजारामपुरी पोलिसांत दिली.

फिर्यादी उदय माळी यांचा बेकरी व्यवसाय आहे. मार्च २०२२ मध्‍ये त्‍यांच्‍या मोबाईलवर रिका लिम हिने व्‍हॉटसॲप मॅसेज पाठविले. सिंगापूरची केपल डायमंड ही कंपनी जागतीक दर्जाची शेअर मार्केटींगची कंपनी असून ती भारत व मलेशियासाठी टेक्नीकल ॲडव्हायझर म्हणून काम करीत असल्‍याचे सांगितले. शेअर्स व लॉटस खरेदीचा व्यवहार कंपनी करते यामध्‍ये पैसे गुंतविले तर तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देतो असे सांगितले. केप्पल डायमंडस डॉट कॉम ही ऑनलाईन वेबसाईटवर खाते उघडू ट्रेडिंग सुरु केले. सुरुवातीला ५० हजारांच्‍या गुंतवणुकीवर फायदा मिळाल्‍याचे माळी यांना भासविण्‍यात आले.

सहा वेगवेगळ्या खात्‍यांवर पाठवले पैसे

फिर्यादी माळी यांनी संबधित महिलेच्‍या सांगण्‍यावरुन हर्बललाईफ न्युट्रीशन शाखा थिरीसुर, राजेश सुब्रमण्यम, कोइंबतोर, आरसीएल बिझनेस बझार, रांची, हरीओम एन्टरप्राइजेस शाखा कोलकाता, क्रिटीकल पावर सोलुशन्स शाखा रांची आणि शाम एन्टरप्राईजेस शाखा उत्तरप्रदेश या खात्‍यांवर २ लाख २ हजार रुपये पाठवले.

पैसे दुप्‍पट झाल्‍याची दिशाभूल

माळी यांनी वेगवेगळ्या खात्‍यात रक्‍कम वर्ग केल्‍यानंतर संबधित महिलेने २० लाख २ हजारांची रक्‍कम वाढून ४० लाख ४४ हजार ३०० रुपये झाल्‍याचे त्‍यांना भासवले. २५ मे रोजी माळी यांनी पैसे काढण्‍याबाबत संशयित महिलेला सांगताच तिने पैसे काढले तर बोनस मिळणार नाही असे सांगितले. यामुळे माळी यांनी पैसे काढले नाहीत.

वेबसाईट अचानक बंद…

पैशांची अत्‍यंत गरज असल्‍याने माळी यांनी ३० मे २०२२ रोजी ही वेबसाईट ओपन करण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी ही वेबसाईट बंद होती. यामुळे त्‍यांनी संशयित रिका लिम हिच्‍याशी संपर्क करणेचा प्रयत्न केला असता मोबाईल लागला. यानंतर कोणत्याही प्रकारे उत्तर कंपनीकडून मिळत नसल्‍याने आपली फसवणूक झाल्‍याचे माळी यांच्‍या लक्षात आले. याबाबत त्‍यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास सुरु आहे.

SCROLL FOR NEXT