Latest

७० हजार कोटींचे प्रकल्प येणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची घोषणा

अमृता चौगुले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेच्या कामकाजात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लक्ष्य केले. भाजपचे 'मिशन बारामती' कायम असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले. दरम्यान, 70 हजार कोटींचे प्रकल्प राज्यात येणार आहेत. यात जवळपास 45 हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात होईल. 35 हजार कोटींच्या प्रकल्पांची मान्यता देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील पहिले अधिवेशन यशस्वी ठरले. रोज जे लोक लोकशाहीविरोधात आवई उठवत होते, ते केवळ 46 मिनिटे या अधिवेशनात होते. यातून त्यांचे लोकशाहीवरील प्रेम दिसले, या शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लक्ष्य केले.

पत्र परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, बारामतीत येऊन आव्हान देणारे त्यांना आजवर कुणी भेटलेच नाही. महाराष्ट्रव्यापी अभियानात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत गेल्याचे सांगत फडणवीस यांनी अजित पवारांच्या टीकेलाही उत्तर दिले. राजकारणात कुणीही अढळपद घेऊन आलेले नाही. गत निवडणुकीत सुप्रिया सुळे प्रारंभी मागे होत्या. नंतर त्या कमी मतांनी जिंकल्या.

इंदिरा गांधीसुद्धा कधीकाळी निवडणूक हरल्या. आमचे मिशन बारामती आहेच; सोबत मिशन महाराष्ट्रही असल्याचे सांगून बारामतीत जोरकस आव्हान देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान, हे अधिवेशन विदर्भाला खूप काही देऊन जाणारे ठरले. सुरुवातीचा गदारोळ वगळता विरोधकांचेही सहकार्य मिळाले. दोन वर्षे अधिवेशन झाले नाही. भात उत्पादकांना 15 हजार रुपये प्रति हेक्टर बोनसची घोषणा झाली. नवीन बोनस पद्धतीत थेट शेतकर्‍यांच्या नावाने पैसे जमा होणार आहेत. छत्तीसगडमधून धान आणून बोनस लाटणार्‍यांना, एजंट, व्यापार्‍यांना यानिमित्ताने चाप बसणार आहे, असे ते म्हणाले.

आरोप करता, मग ऐकण्याची मानसिकता ठेवा : मुख्यमंत्री

अधिवेशनाच्या निमित्ताने आमच्या काही लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सभागृहापेक्षा बाहेरच अधिक चर्चा केली. आरोप करताना त्याचे उत्तर ऐकून घेण्याचीही मानसिकता असावी. पण सत्ताधारी आरोप खोडून काढणार याची पुरेपूर कल्पना असल्याने विरोधक सभागृह सोडून गेले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन आटोपल्यानंतर पत्रपरिषदेत केली. विदर्भवासीयांना अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. 10 दिवसच काम चालले असले तरी रोज सकाळी 9 ते रात्री उशिरापर्यंत चर्चेतून अनेक प्रश्न सोडविले गेले. विरोधकांनी मुद्दे लावून धरले नसतानाही सरकारने लोकांना हवे ते दिले. विदर्भाला प्रथमच भरभरून दिले. यापुढेही काही कमी पडू देणार नाही, असा विश्वास दिला.

चांगल्या गोष्टीत मन रमवा : अजित पवारांचा मुख्यमंत्र्याना सल्ला

सभागृहात प्रथमच विरोधकांच्या हक्काच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात राजकीय भाषण ऐकायला मिळाले. विरोधी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कुठेही नव्हते. ज्यांना सोडून आलात, ते जास्त मनाला लावून घेण्याची गरज नाही. आता त्यांच्यातून बाहेर या. चांगल्या गोष्टीत मन रमवा. झाले-गेले विसरा. पुढे जा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

पवार म्हणाले, राज्याचा प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित पुढे ठेवून बोलावे. मुलाच्या वयाच्या मुलास लक्ष्य करणे योग्य नाही. खरे तर पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासोबत असलेल्या चांगल्या संबंधातून राज्यात काहीतरी आणा. अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. राष्ट्रपुरुषांबद्दल जाणीवपूर्वक बेताल वक्तव्य करणार्‍यांचा निषेध तुम्ही करीत नाही. सत्तारूढ पक्षाच्या 40 पैकी 31 आमदारांना 'वाय प्लस' श्रेणीची सुरक्षा व्यवस्था पुरविली गेली. यावर महिन्याकाठी प्रत्येकी 20 लाख रुपये खर्च पडतो. तर विरोधी पक्षाच्या आमदारांची सुरक्षा काढली जाते. भास्कर जाधव यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाला. तीन भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे दिले. कारवाई केली नाही. महागाई, बेरोजगारी आदी विषयांवर बोलले नाहीत. नवी पहाट, नवे वर्ष येत आहे. येथून पुढे राज्याचे प्रमुख म्हणून निर्णय घ्या, असा सबुरीचा सल्ला पवार यांनी दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या पक्षपातीपणाचा विरोध करताना ते भाजपचे कार्यालय चालवितात का, असा घणाघाती आरोप पत्रपरिषदेत केला.

घोटाळ्यांचे सरकार : अंबादास दानवे

राज्यात घोटाळ्यांचे सरकार आहे. टीईटी घोटाळ्यात सुस्पष्ट सहभाग असतानाही मंत्र्याला संरक्षण दिले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महापुरुषांचा विषय असो की सीमा प्रश्न असो, सरकारने काहीच उत्तर दिले नाही. गेंड्याचे कातडे पांघरून सरकार बसले आहे. विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला नाही. पीक विमा संदर्भात सरकारने उत्तर दिले नाही. कापसाचा मुद्दा महत्त्वाचा असतानाही, त्याबाबत निर्णय घेतला गेला नाही. गेल्यावेळी 14 हजाराचा भाव होता. आता तो सात हजार झाल्याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले.

माचिसची काडीही उगारली नाही…

32 वर्षांच्या युवकाला सरकार घाबरल्याचा आरोप करणारे आदित्य ठाकरे यांनाही फडणवीस यांनी रोखठोक उत्तर दिले. 'नाखून कटा के शहीद होना' यासारखा हा प्रकार आहे. त्यांच्या पिताश्रींना आम्ही घाबरलो नाही. त्यांच्या नाकाखालून 50 जण आणले. त्यावेळी मुंबईला आग लागेल, मुंबई जळेल, अशी भाषा केली केली; पण माचिसची काडीही उगारली गेली नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT