Latest

सरपंचपदाचे आरक्षण चुकले; ५८ ग्राम पंचायतींच्या निवडणुका स्थगित

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : सरपंच पदाच्या आरक्षणपदाची प्रक्रिया चुकीची झाल्याने मोहाडी तालुक्यातील तब्बल ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सोबतच या प्रकाराची चौकशी करुन दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमान्वये मोहाडी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. या निवडणुकीत सरपंचपदाची निवड थेट जनतेमधूनच होणार आहे. मात्र, या ५८ ग्रामपंचायतीमधील सरपंच पदांचे आरक्षण पद्धतीमध्ये झालेल्या चुकीमुळे नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविणे आवश्यक झाले आहे.

ग्रामपंचायतीच्या सदस्य व सरपंच यांच्यासाठी एकत्र निवडणूक होणार असल्यामुळे या ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदाच्या निवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच तहसीलदार मोहाडी यांनी प्रसिद्ध केलेली निवडणूक नोटीससुद्धा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी चुकीचे आरक्षण काढण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करावी. त्याबाबतचा अहवाल दोन आठवड्यांमध्ये आयोगास सादर करावा, असेही आदेश नमूद करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT