Latest

NCB Raid : युगांडातील महिलेच्या पोटातून काढल्या ड्रग्जच्या ५४ कॅप्सूल

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) मुंबईतील ड्रग्ज पुरवठादार आणि पेडलर्स विरोधात कारवाईचा वेग वाढविला आहे. एनसीबीच्या (NCB Raid) मुंबई पथकाने विमानतळ येथे कारवाई करत युगांडा देशाच्या एका महिलेला ड्रग्जसोबत अटक केली. एनसीबीने तिच्या जवळून ५३५ ग्रॅम वजनाच्या हेरॉईन ड्रग्जच्या ४९ कॅप्सूल, कोकेन ड्रग्जच्या १७५ ग्रॅम वजनाच्या १५ कॅप्सूल असा ड्रग्जसाठा जप्त केला.

युगांडा येथून एक महिला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती एनसीबीच्या (NCB Raid) मुंबई विभागाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने २८ मेरोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सापळा रचला. एनसीबीच्या पथकाने युगांडाच्या एका महिलेला ताब्यात घेतले.

एनसीबीच्या पथकाने तिच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. ती शरीर लपवत असल्याचे लक्षात येताच एनसीबीने तिच्याकडे सखोल चौकशी केली असता शरीरात सुमारे ११ प्रतिबंधित कॅप्सूल घेऊन जात असल्याचे तिने कबूल केले. वेगवेगळ्या चिकट पट्टीचा वापर करून १० कॅप्सूल लपविण्यात आल्या होत्या. एनसीबीने कॅप्सूलमध्ये लपविलेले ११० ग्रॅम हिरोईन जप्त केले.

पुढे तिला सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्या पोटातून ड्रग्जने भरलेल्या ५४ कॅप्सूल बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. यातील ३९ कॅप्सूलमध्ये हेरॉईन आणि १५ कॅप्सूलमध्ये कोकेन होते. एनसीबीने १७५ ग्रॅम कोकेन आणि ४५२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. एकूणच एनसीबीने या महिलेकडून ५३५ ग्रॅम हेरॉईन आणि १७५ ग्रॅम कोकेन भरलेल्या एकूण ६४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू असल्याचे एनसीबीने सांगितले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT