Latest

Cow Milk : गाय दुधाला 5 रुपये अनुदान

Shambhuraj Pachindre

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दुधाचे दर घसरल्याने अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना मदत म्हणून सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणार्‍या गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Cow Milk)

राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत लक्षवेधी सूचना माडून चर्चा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी दोन्ही सभागृहांत निवेदन करून दुधाच्या अनुदानाची माहिती दिली. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल. या योजनेचा कालावधी 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 असा असेल. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन योजनेला मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. (Cow Milk)

या योजनेसाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी यांना 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफसाठी प्रतिलिटर किमान 29 रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकर्‍याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकर्‍यांना राज्य सरकारच्या वतीने प्रतिलिटर पाच रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील, असेही विखे-पाटील म्हणाले. विशेष अनुदानाची योजना दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत राबविली जाईल. याविषयीचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांचे भाव हे प्रामुख्याने मागणी आणि पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी, शिवाय बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याशिवाय, दुधाच्या पुष्ट काळातही दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी राज्य सरकार विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून, दूध उत्पादक शेतकर्‍यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्याअनुषंगाने सरकारने यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शेतकर्‍यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे भुकटी आणि बटरमध्ये रूपांतरण करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता, याची आठवण विखे-पाटील यांनी करून दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT