Latest

China Earthquake : चीनचा शानडोंग प्रांत भूकंपाने हादरला; अनेक इमारती कोसळल्या, १० जण जखमी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या शानडोंग प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डेझोउ शहरातील पिंगयुआन काउंटीमध्ये ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. आज (दि.६) स्थानिक वेळेनुसार पहाटे अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचे चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने सांगितले.

भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून यात १० जण जखमी झाले आहेत. भूकंपाचे केंद्र डेझोऊ शहराच्या २६ किमी दक्षिणेस १० किमी खोलीवर होते. याआधी शनिवारी अफगाणिस्तानमध्येही ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश प्रदेश होता. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारीही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानचा खैबर पख्तूनख्वा प्रांत होता. या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे या वर्षी जगाने विध्वंस पाहिला आहे. ६ फेब्रुवारी रोजी तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आणि तुर्की आणि सीरियामध्ये ४४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तेथे ८० हजार लोक जखमी झाले. या भूकंपामुळे दोन्ही देशांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. हा तोटा तुर्कस्तानच्या जीडीपीच्या चार टक्के इतका आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT