Latest

Mumbai Gold : रेकॉर्डब्रेक! मुंबईत दसर्‍याच्या मुहुर्तावर 400 कोटींच्या सोन्याची लयलूट

backup backup

Mumbai Gold : दसर्‍याच्या मुहुर्तावर सोन्याच्या पानांसह यंदा सोन्याच्या दागिन्यांचीही मुंबईकरांनी खुल्या दिलाने लयलूट केल्याची माहिती समोर आली आहे. सराफा बाजारासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लग्नसराईहून अधिक सोने हे दसर्‍याचा मुहूर्त असल्याने खरेदी करत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे होते. परिणामी, याआधीचे सर्व रेकॉर्ड मोडून काढत मुंबईतील सराफा बाजाराने 400 कोटींची उलाढाल नोंदवली होती.

याबाबत मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगतिले की, अपेक्षेहून कैक पटीने सराफा बाजाराला ग्राहकांची पसंती मिळाली. लग्नसराईसाठी ग्राहक गर्दी करतील, असे वाटले होते. मात्र खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांकडून मुहूर्त म्हणून खरेदी करत असल्याचे सांगण्यात येत होते.

Mumbai Gold : ३० टक्के नाणी तर ७० टक्के दागिन्यांची विक्री

दसर्‍याच्या मुहूर्तावर झालेल्या सोने खरेदीत 30 टक्के सोन्याच्या नाण्यांचा समावेश आहे. याउलट सोनसाखळी, बांगड्या, नेकलेस, हार आणि झुमक्याचा समावेश असलेला कुंदन सेट अशा मोठ्या प्रमाणात दागिने खरेदीचे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावरही सराफा बाजारस सोन्याची झळाळी मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

झवेरी बाजारात दागिने खरेदीसाठी आलेल्या एस.एस. शाह या महिलेने सांगितले की, वर्षातून साडेतीन मुहुर्तांमध्ये सोन्याचे काही ना काही खरेदी करत असते. यंदा दसर्‍याला दागिन्यांची बुकिंग करत आहे. दिवाळीला या नवीन दागिन्यांचा साज करणार आहे. भविष्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळे चांगली गुंतवणूकही होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.

मुंबईच्या गल्लीबोळात सोने खरेदीसाठी गर्दी

दरम्यान, झवेरी बाजारच नव्हे, तर मुंबईतील गल्लीबोळांमधील सराफा पेढ्यांवर ग्राहकांची रीघ दिसून आली. 50 हजारावर पोहचलेल्या सोने खरेदीला ग्राहकांनी अजिबात नाक मुरडले नाही. मनिष संघवी या सराफाने सांगितले की, गेल्या दीड वर्षांपासून दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी वाट पाहिली आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांत खरेदीसाठी बाहेर न पडलेले ग्राहक यावेळी दसर्‍याला खरेदीसाठी आले होते. त्यात काही लग्नासाठी, तर काही इतर कार्यक्रमांसाठी खरेदी करत होती. यामध्ये 40 टक्के ग्राहक हे घरात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम नसताना फक्त दसर्‍याचा मुहूर्त साधण्यासाठी आल्याचे संघवी यांनी स्पष्ट केले.

मुंबईने तोडले रेकॉर्ड

साडेतीन मुहूर्तांना राज्यातील सराफा बाजार 350 ते 400 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करतो. यंदा मात्र मुंबईने सायंकाळी 8 वाजेपर्यंत सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. रात्री 10 वाजेपर्यंत 400 कोटींच्या घरात मुंबईतील उलाढाल पोहचेल, असा विश्वास सराफा बाजाराने व्यक्त केला. विशेष म्हणजे रात्री उशीरापर्यंत सराफा पेढ्यांवर ग्राहकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे मुंबईने यंदा राज्याच्या जोडीची उलाढाल नोंदवली.

SCROLL FOR NEXT