Latest

विहिरीची रिंग पडून मुरूमाखाली ४ मजूर गाडले गेले ; बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

अमृता चौगुले

भिगवण /शेटफळगडे : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे शेतातील विहिरीच्या रिंग बांधकाम करताना रिंग पडुन व मुरूम ढासळल्याने इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार मजूर गाडले गेल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही विहीर १२७ फूट खोल व १२० गोल व्यासाची आहे. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32 वर्ष), जावेद अकबर मुलाणी (वय 30 वर्ष),परशुराम चव्हाण (वय 30 वर्ष) आणि मनोज मारुती चव्हाण (वय 40 वर्ष) अशी या मजूरांची नावे आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद भोईटे, बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे कर्मचारी वर्ग तसेच तहसीलदार तळ ठोकून आहे. या अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन तसेच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. याबाबत थोडाक्यात माहिती अशी की, सणसर येथील विजय अंबादास क्षीरसागर यांच्या म्हसोबावाडी (ता. इंदापुर) गावाच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमीन गट नंबर ३३८ मध्ये असलेल्या विहिरीच्या रिंग बांधकाम सुरु होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. चारही लोक इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावचे आहेत. हे चार कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करीत होते आणि अचानक त्यांच्यावरती  मुरुमाचा ढीग आणि विहिरीचा स्लॅब कोसळला. त्या ढिगार्‍याखाली हे मजूर अडकले गेलेत. ज्यावेळी हे चारही लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाही तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरी जवळ येऊन थांबला.

त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्‍याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. काही जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी आमदार दत्तात्रय भरणे तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित आहेत. अद्याप एकही कामगार सापडला नाहीये.  सहा पोकलेन मशीनच्या सहाय्याने ढिगारा उपसण्याचे काम चालू असून शोध मोहीम सध्या सुरू असून घटनास्थळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली आहे तसेच घटनास्थळी तहसीलदार श्रीकांत पाटील भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित आहे.

अजूनही यश नाही.. 

आतापर्यंत सहा मशीनच्या साह्याने ढिगारा हलवण्याचे काम चालू आहे मात्र विहिरीची खोली व रुंदी जास्त प्रमाणात असल्याने व त्यावर बांधण्यात आलेली रिंग सुमारे 30 फूट उंचीची असल्याने ते काढण्यासाठी आता क्रेन व छोटा पोकलेन आणण्यात आला आहे. अद्याप एकही मजूर सापडलेला नाही

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT