पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पायीन भागात सुरक्षा दलांनी नुकत्याच केलेल्या एका संयुक्त कारवाईत ३ दहशतवाद्यांना मारण्यात आले. याबाबतची माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने X वर पोस्ट करत दिली आहे.
"एक संयुक्त ऑपरेशन ६-७ मे च्या मध्यरात्री कुलगामच्या रेडवानी पायीन भागात सुरू झाले होते. सुमारे ४० तासांच्या अथक कारवाईनंतर ते संपले. या कारवाईत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही कारवाई म्हणजे दहशतवादी गटांवर केलेला एक मोठा प्रहार आहे." असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. चिनार कॉर्प्स काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही सांगण्यात आले आहे.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए तैयबाचा टॉप कमांडर बासित अहमद दार याच्यासह तीन दहशतवादी ठार झाले होते. कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पाइन भागात मंगळवारी सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु होती. यात ३ दहशतवादी ठार झाले. त्यात लष्कर-ए तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंट (TRF) चा टॉप कमांडर बासित दार देखील चकमकीत मारला गेला.
४ मे रोजी पुंछ सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. मात्र, शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरु झाली. ही कारवाई तब्बल ४० तास चालली.
कुलगाममध्ये चकमकीत ठार झालेला बासित दार हा "ए" कॅटेगरी दहशतवादी असून तो द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) शी संबंधित होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विधि कुमार बिरदी यांनी सांगितले होते. ते म्हणाले की, सुरक्षा दलांना रेडवानी गावात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री या भागाची घेराबंदी करण्यात आली. तसेच शोधमोहीम सुरू करण्यात आली.
हे ही वाचा :