महाड श्रीकृष्ण द. बाळ किल्ले रायगड येथे आज (सोमवार) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आलेल्या शिवभक्तांपैकी उत्तर प्रदेशातील रामू छोटुलाल यादव (वय 19) व विशाल रामेश्वर थोरात (वय 18) राहणार सातारा हे किल्ले रायगड परिसरात आले होते. यावेळी रायगड फिरून खाली उतरत असताना त्यांचा रस्ता चुकला. अन् या दरम्यान ते दोघेही हिरकणी बुरुज परिसरात अडकले. यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक शिलेदार रेस्क्यू टीमच्या सहाय्याने या दोघांनाही सुखरूप बाहेर काढले.
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर लाखो शिवभक्त, पर्यटक येत असतात. यामुळे गडावर मानसांची गर्दी वाढत आहे. याबरोबरच नवीन समस्यांही निर्माण होत असून, स्थानिक पोलीस प्रशासनाला यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येणाऱ्या शिवभक्तांमध्ये तरुणांचा असलेला मोठ्या प्रमाणातील सहभाग व पायी किल्ल्यावर जाण्याचा असलेला मानस यामधून नवीन समस्या समोर येत आहेत.
दरम्यान यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही युवक सकाळी किल्ल्यावरून खाली उतरत असताना मुख्य मार्ग चुकून हिरकणी बाजुच्या पुढच्या दिशेने गेल्याची माहिती दिल्याचे सांगितले.
आज हिरकणी बुरुज परिसरात रस्ता चुकून गेलेल्या दोन तरुण युवकांना सुरक्षितपणे त्या ठिकाणाहून बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली. यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने शिलेदार रेस्क्यू टीमच्या मदतीने केलेली कार्यवाही यशस्वी ठरली. तरीही आगामी काळात गडावर येणाऱ्या तरुणांच्या अशा पद्धतीच्या घटनांबाबत अधिक जागरूकता घेणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
या दोन तरुणांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी शिलेदार रेस्क्यू टीम व स्थानिक तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांचे मार्गदर्शन लाभले. तातडीने कार्यवाही करून अडकलेल्या दोन तरूणांना सुरक्षीत बाहेर काढल्याने शिवभक्तांनी पोलीस प्रशासन व रेस्क्यू टीमचे आभार मानले.
हेही वाचा :