Latest

इस्लामपूर : नायजेरियन तरुणाकडून १६ लाखांचे कोकेन जप्त

backup backup

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा

पुणे-बेंगलोर महामार्गानजीक पेठनाका (ता. वाळवा) येथे अंमली पदार्थ तस्करी करणारा परदेशी युवक ॲडव्हर्ड जोसेफ इदेह (मूळ रा. नाजेरिया, सध्या रा. बेंगलोर) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली.

सोमवारी पहाटे केलेल्या या कारवाईत परदेशी युवकाकडून १६३.६१० ग्रॅम कोकेन पोलिसांनी हस्तगत केले असून, त्याची बाजारात १६ लाख ३० हजार इतकी किंमत आहे. इदेह हा कोकेन घेवून मुंबईहून बेंगलोरला जाणार होता. सोमवारी दुपारी इदेह याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. महिन्यातील ही दुसरी कारवाई पोलीसांनी केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना गुप्त बातमीदाराकडून खासगी बसमधून अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पेठनाका येथील एका हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचला. पहाटेच्यावेळी एका खासगी कंपनीची बस (क्र.के.ए.५१/एजी-१४५७) तेथे आली. त्यांनी बसमधील प्रवाशांची अंगझडती घेतली. त्यावेळी अॅडव्हर्ड इदेह याच्या बॅगेतील शॅम्पूच्या बाटलीमध्ये कोकेनच्या १५ कॅप्सूल मिळून आल्या. त्या कॅप्सूलमधील कोकेनचे वजन १६३.६१० ग्रॅम इतके असून त्याची किंमत अंदाजे १६ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.

पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण साळुखे, पोलिस देवेंद्र सासणे, शरद जाधव, प्रशांत देसाई, अरुण कानडे, संताजी पाटील, सचिन सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT