इंदापूर : शवविच्छेदन केलेल्या मृतदेहांचे अवशेष खातात भटकी कुत्री आणि डुक्करे! | पुढारी

इंदापूर : शवविच्छेदन केलेल्या मृतदेहांचे अवशेष खातात भटकी कुत्री आणि डुक्करे!

इंदापूर (जि. पुणे), पुढारी वृत्तसेवा

इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या शवविच्छेदन गृहाशेजारीच, शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तींचे अवशेष उघड्यावर टाकण्यात आले आहेत. ते अवशेष डुक्करे, कुत्रे आदी प्राणी खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने अधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा दिसून येत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त करत वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

विविध प्रकारच्या अपघातात मृत्यू झालेल्यांचे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले जाते. मयत व्यक्तीचे शरीराचे अवशेष काढून (विशिष्ट केमिकल) एन्झायमच्या मदतीने ते अवशेष प्लास्टिक बरणीत साठवणूक करून प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. त्याचा एक नमुना हा याच ठिकाणी साठवण्यात येतो. मात्र काही कालावधीनंतर सदरचे अवशेष हे एका विशिष्ट पद्धतीने नष्ट करावयाचे असतात. मात्र इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाने असे न करता सदरचे अवशेष प्लास्टिक भरणीसह शवविच्छेदन गृहाशेजारीच उघड्यावर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मांसाचे सर्व तुकडे जळाले गेलेले नाहीत, तर उघड्यावर पडलेल्या या अवशेषांना सध्या डुक्करे, भटकी कुत्री खात असल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय.

सोमवारी (दि. २७) जनार्धन सिताराम गोळे (वय ६५, रा. अगोती नं.१, ता.इंदापूर) यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी या ठिकाणी आणले होते. यावेळी त्यांचे नातलग गणेश पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडल्याने तो समोर आला.

याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांना विचारले असता, साठवलेले अवशेष हे दोन-तीन दिवसांत पोलिस विभागाने आपल्या ताब्यात घ्यावयाचे असतात, जर ते नेले नाहीत तर त्याची आम्हाला गरज नाही म्हणून ते नष्ट करण्यासाठी त्याबाबत पोलीस लेखी पत्र देतात. या संदर्भात विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया आपणास माहित नाही. संबंधित विभागाला ते विचारावे लागेल. मात्र इंदापूर उपजिल्हा रुग्णालय आवारात टाकण्यात आलेले अवशेष याबद्दलची माहिती आपणास नसून तसे घडले असल्यास ते पुर्णतः चुकीचे आहे. याबाबत अधिक माहिती घेऊ असे सांगितले.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुहास शेळके यांना याबाबत विचारणा केली असता, हा प्रकार चुकीचा घडला असल्याचे त्यांनी मान्य केले. सदर अवशेषांची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आपण कोणतही आदेश दिले नसल्याचे सांगत अधिक भाष्य करणे टाळले.

हेही वाचा

Back to top button