औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा
मागील काही दिवस शहरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. आज बारा वर्षीय कोरोनाबाधित मुलीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्या मेंदूत इन्फेक्शन होते. त्यामुळे तिचा मृत्यू कोरोनामुळेच झाला, असे म्हणता येणार नाही, असे महापालिकेच्या आराेग्य अधिकार्यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद महापालिका हद्दीत आज एकूण ६७५ नवीन रुग्ण आढळून आले. दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका (५७ वर्षीय) पुरुषाचा आणि एका (१२ वर्षीय) मुलीचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, ही बारा वर्षीय मुलीला शहरातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू हाेत आहेत; परंतु यात इतक्या कमी वयाचा मृत्यू होण्याची ही तिसऱ्या लाटेतील पहिलीच वेळ आहे.
बारा वर्षीय मुलीला इन्सेफालिटीसमुळे एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. इन्सेफालिटीस म्हणजे एक प्रकारे मेंदूतील इन्फेक्शन असते. तिला प्रचंड ताप होता. म्हणून तिची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला एका खासगी हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. तिथे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचा मृत्यू कोरोनामुळेच झाला, असे म्हणता येणार नाही.
डॉ. पारस मंडले, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी