पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संयुक्त उपक्रमातून ब्लॉक चेन या संगणक प्रणालीचा वापर करुन ऑनलाईनद्वारे शेतमाल तारणाच्या गोदाम पावतीवर शेतकर्यांच्या बँक खात्यावर सुमारे 100 कोटी रुपयांचे यशस्वी कर्जवाटप करण्यात आले आहे. शेतकर्यांचा योजनेस चांगला प्रतिसाद असून आगामी काळात सुमारे एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट या संयुक्त योजनेतून ठेवण्यात आल्याची माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
राज्य बँकेचे प्रशासक अनास्कर यांच्यासह प्रभारी दिलीप दिघे, वखार महामंडळाचे सल्लागार व स्मार्ट प्रकल्पाचे नोडल ऑफिसर अजित रेळेकर, उप महाव्यवस्थापक प्रशांत बारावकर आणि ब्लॉक चेन प्रणालीचे आशिष आनंद आदींनी बुधवारी (दि.14) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जागतिक बँक अर्थसहाय्यित मा.बाळासाहेब ठाकरे कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत गोदाम पावतीवर ऑनलाईन कर्जाचे वितरणासाठी ब्लॉक चेन या ऑनलाईन संगणक प्रणालीचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालाच्या मालाच्या तारणावर त्याच्या किंमतीच्या 70 टक्क्यांइतका कर्जपुरवठा केवळ 9 टक्के व्याज दराने केला जातो. आत्तापर्यंत 4 हजार 543 अर्जाद्वारे बँकेने 100 कोटी रुपयांचे यशस्वी कर्ज वाटप केले. त्या कर्जवितरणापैकी एकूण 2 हजार 555 शेतकर्यांनी सुमारे 55 कोटींइतक्या कर्जाची परतफेड केली असुन उर्वरित 1 हजार 988 शेतकर्यांकडे 45 कोटींची येणे बाकी आहेत. व्यापार्यांकडूनही याच योजनेतून कर्जाची मागणी होत असून व्याजाचा दर 11 राहणार असल्याची माहिती अनास्कर यांनी दिली.
विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी 15 दिवसांत योजना
विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्य कापूस व पणन महामंडळातर्फे स्मार्ट कॉटन प्रकल्प राबविला जात आहे. त्याअंतर्गतही शेतकर्यांना कापसाच्या तारणावर कापूस महामंडळ व ब्लॉक चेनच्या सहकार्याने राज्य बँकेतर्फे पुढील 15 दिवसांत अशीच योजना राबविली जाणार असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.
"राज्य बँक व वखार महामंडळाच्या शेतमाल तारणावरील कर्जाचा राज्य बँकेचा 9 टक्के असा वाजवी कर्ज व्याज दर आहे. अन्य बँकांमध्ये राष्ट्रयीकृत बँकांचा 8 टक्के व अन्य बँकांचे 18 टक्क्यांपर्यंत व्याज दर आहे. वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने शेतकरीभिमुख योजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकर्यांकडून सोयाबीन, हळद, तूर, हरभरा, मका या शेतमालाची सर्वाधिक साठवणूक होत आहे.
– अजित रेळेकर , सल्लागार व स्मार्ट प्रकल्पाचे नोडल ऑफिसर, राज्य वखार महामंडळ, पुणे.
हे ही वाचा :