तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : पिंपळे जगताप येथील एका महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षणासाठी मामाच्या गावी असलेल्या नात्यातील युवतीच्या वडिलांची जमीन स्वतःच्या नावावर केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 24) मुक्ताबाई आप्पाजी नाईकनवरे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील नेहा नाईकनवरे या युवतीच्या आईच्या निधनानंतर 2014 मध्ये युवतीचे वडील अरविंद नाईकनवरे यांचेदेखील निधन झाले. त्यानंतर युवतीचे मामा धानोरी येथे युवतीचा सांभाळ करत तिचे शिक्षण पूर्ण करत होते.
दिवसांपूर्वी नेहा हिने ऑनलाइन पद्धतीने तिच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे सातबारा उतारे पाहिले असता तिच्या वडिलांचे नाव रद्द होऊन नेहाची चुलत आजी मुक्ताबाई नाईकनवरे यांचे नाव असल्याचे तिला दिसून आले. त्यामुळे तिने पिंपळे जगताप तलाठी कार्यालय तसेच शिरूर तहसीलदार कार्यालय येथे जाऊन जमिनीच्या वारस नोंद याबाबतचे कागदपत्र पाहिले असता मुक्ताबाई नाईकनवरे यांनी त्या अरविंद यांच्या एकट्या वारस असून, इतर कोणीही वारस नाही, असे खोटे प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे देऊन जमीन स्वतःच्या नावावर करून घेत नेहा नाईकनवरे यांची फसवणूक केल्याचे समोर आले.
याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात नेहा अरविंद नाईकनवरे (वय 26, रा.मुंजाबा वस्ती, धानोरी पुणे, मूळ रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर) या युवतीने फिर्याद दिली. पोलिसांनी मुक्ताबाई आप्पाजी नाईकनवरे (रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर) या महिलेवर फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे तपास करीत आहेत.
हेही वाचा :