कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड-मजरेवाडी (Kurundwad) दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर ऊस वाहतूक करणार्या बैलगाडीच्या चाकाखाली सापडून अकरा वर्षीय मुलगी जागीच ठार झाली. पायल संतोष लाडाने (रा. गवरवाडी, ता. केज, जि. बीड) असे तिचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजता घडली.
असरोबा लाडाने व त्यांची टोळी तेरवाड हद्दीतील नितीन दत्तवाडे यांच्या शेतातील ऊस बैलगाडीत भरून कारखान्याकडे जाणार होते. त्यावेळी पायलची चुलती लक्ष्मीबाई आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन पायलसह बैलगाडीत बसण्यासाठी जात होती.
बैलगाडीच्या पुढे जाऊन थांबण्यासाठी रस्त्याच्या कडेने जात असताना पायल पाय घसरून पडली. यावेळी बैलगाडीचे डाव्या बाजूचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली.
संबंधित साखर कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी व्ही. जी. जाधव यांनी अपघातस्थळी भेट देऊन माहिती घेतली व कुरुंदवाड पोलिसात वर्दी दिली. पायलचे आई-वडील एकसंबा येथे ऊस तोडीसाठी गेले होते.
पायलचा चुलत भाऊ एक वर्षाचा असल्याने तिचा सांभाळ करण्यासाठी चुलता असरोबा लाडाने हिच्या टोळीसोबत ती आली होती. पायलच्या आई वडिलांच्या शोकाने उपस्थितांना अश्रू अनावर झाले.