पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (WI vs ENG) यांच्यातील ब्रिजटाऊन येथे खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना कॅरेबियन कर्णधार क्रेग ब्रॅथवेटसाठी (Kraigg Brathwaite) संस्मरणीय ठरला. त्याने दोन्ही डावात इंग्लिश गोलंदाजांचा शानदारपणे मुकाबला केला आणि आपल्या संघाला सामना वाचवण्यास मदत केली. या सामन्यात, ब्रॅथवेटने विंडिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात एकूण ६७३ चेंडूंचा सामना केला आणि कसोटी सामन्यात कोणत्याही कॅरेबियन फलंदाजाने सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम केला. अशाप्रकारे त्याने विंडिजचा माजी कर्णधाराने ब्रायन लारा याचा १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. ब्रॅथवेटने (Kraigg Brathwaite) पहिल्या डावात ४८९ चेंडूत १६० धावा केल्या आणि नंतर १८४ चेंडूंचा सामना करत अंतिम दिवशी संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी ५६ धावा केल्या. त्याच्या खेळी चिवट फलंदाजीमुळे इंग्लिश संघ विजयापासून वंचित राहिला.
याआधी, वेस्ट इंडिजकडून कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये ब्रायन लाराचे नाव आघाडीवर होते. त्याने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५८२ चेंडूंचा सामना केला होता. त्यांच्यानंतर माजी दिग्गज अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचा क्रमांक लागतो. सोबर्स यांनी १९५८ मध्ये ५७५ चेंडूंचा सामना केला होता. (Kraigg Brathwaite)
जगातील फलंदाजांच्या बाबतीत चर्चा करायची झाल्यास ब्रॅथवेट हा सर्वाधिक चेंडू खेळणारा चौथा फलंदाज ठरला आहे. एका सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या हूटन यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८४७ चेंडू खेळले होते. ब्रॅथवेटने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ६७३ चेंडू खेळले आणि २१ चौकारांच्या मदतीने २१६ धावा केल्या. त्याने एकूण १६ तास फलंदाजी करत आपल्या संघाला पराभवापासून वाचवले.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ९ गड्यांच्या मोबदल्यात ५०७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४११ धावा केल्या आणि पाहुण्या संघाने ९६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने आपला दुसरा डाव ६ बाद १८५ धावांवर घोषित केला आणि वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ५ बाद १३५ धावा केल्या.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजसाठी कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने (Kraigg Brathwaite) पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. त्याने १८४ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा केल्या. मात्र, संघाची मधली फळी फ्लॉप झाली. मात्र जर्मेन ब्लॅकवूडने २७ आणि जोशुआ डी सिल्वाने नाबाद ३० धावा करत सामना बरोबरीत आणला.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. तिसरा कसोटी सामना २४ ते २८ मार्च दरम्यान ग्रेनाडा येथे खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून कोणता संघ मालिका खिशात टाकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.