Latest

साहेब दैवत, पण पाठिंबा दादांना ! कोपरगावचे आमदार काळे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत

अमृता चौगुले

नगर/ कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीत बंडाळी होत असताना परदेशात असलेले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे बुधवारी भारतात परतताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहचले. शरद पवार यांना दैवत संबोधत आ. काळे यांनी पाठिंबा मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिला आहे. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक हे याच मतदारसंघातून 2024 च्या विधानसभेची तयारी करत असल्याने 'कोपरगावची राजकीय समीकरणे' बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आ. आशुतोष काळे यांची पहिलीच टर्म असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे अध्यक्षपदही दिले होते. राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी घेण्याचा निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवीत असताना आ. आशुतोष काळे हे कुटुंबीयांसह परदेशात होते. ते साहेबांसोबत जातील की दादांसोबत याबाबत विविधांगी चर्चा सुरू होती. मात्र देशात परतताच ते 'देवगिरी'वर पोहचले. तेथे त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असून त्यातील चार आमदार हे अजित पवारांच्या सोबत आहेत. राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे, कर्जत-जामखेडचे रोहित पवार हे दोघेच शरद पवारांसोबत राहिले आहेत. आ. संग्राम जगताप यांनी सर्वात अगोदर दादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यानंतर पारनेरचे नीलेश लंकेही दादांच्या गोटात पोहचले. दादांच्या शपथविधीला राजभवनात उपस्थित असलेले अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे शरद पवारांच्या मेळाव्यालाही उपस्थित होते. नंतर पुन्हा ते दादांच्या सोबत गेले आहेत. शरद पवारांची पाठराखण करणारा जिल्हा म्हणून नगरकडे पाहिले जात होते, मात्र सहापैंकी चार आमदार सोबत आल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात वाढली आहे.

कोपरगावात काळे-कोल्हे हे राजकीय प्रतिस्पर्धी कुटुंब आहेत. राज्यात भाजप-शिंदे-पवार असे सत्ता समीकरण उदयास आले आहे. आशुतोष काळे हे आमदार असले तरी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे आगामी विधानसभेसाठी दंड थोपटून तयार आहेत. दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी असलेले काळे-कोल्हे यांचे सूर जुळणे कठीण असल्याची चर्चा असून आ. काळे यांच्या भूमिकेने कोपरगावची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत, याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व मतदारांचा पूर्ण पाठिंबा राहील याची खात्री आहे.
                                                               – आमदार आशुतोष काळे 

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT