Latest

Kolhapur : मंत्र्यांना कोल्हापूरची वस्तुस्थिती कळाली असती तर काय बिघडले असते?

सोनाली जाधव

कोल्हापूर : राजेंद्र जोशी : व्यवस्थेमध्ये दीर्घकालीन दोष तसेच चालू राहिले आणि कारभारात गलथानपणाने उंची गाठली की, त्यावर तात्कालिक पांघरूण घालण्याचे काम प्रशासनाकडून केले जाते. तसा अनुभव रविवारी कोल्हापूरकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अनुभवला. व्हीआयपी येणार म्हणून प्रशासनाने शनिवारपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांना हलविले. काही ठिकाणी रस्त्यांवर डांबर पडले, तर ड्रेनेजसाठी खोदलेले खड्डे दुरुस्ती न करताच भरले गेले. यामुळे प्रशासनाची कर्तबगारी (?) झाकली गेली; पण सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांच्या घरातील चूल पेटणे मात्र अवघड होऊन गेले. असे पांघरूण घालण्याऐवजी कोल्हापूरच्या वस्तुस्थितीचे दर्शन मंत्र्यांना घडविले असते, तर काय बिघडले असते? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यावाचून राहिला नाही. (Kolhapur)

रविवारी कोल्हापूरचा बाजार असतो. बाजाराच्या दिवशी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी कोल्हापुरात दाखल होतात. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या श्रमिकांची दुतर्फा गर्दी होते. दिवसभराच्या व्यापारातून मिळालेल्या चिरीमिरीवर अनेकांची सायंकाळी घरात चूल पेटते; पण व्यापारच करू न दिल्यामुळे अनेकांच्या घरांतील चूल पेटणे अवघड झाले.

कोल्हापुरात रविवारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. त्यांच्याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विकासकामांची यादी दिली. एका बाजूला प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद करण्याची सूचना देऊन स्वच्छ केले होते आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी शहराच्या विकासाची निवेदने देत होते. हा एक अनोखा विरोधाभासही ठळकपणाने पुढे आला. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे श्रमिकांना व्यवसाय जसे करता आले नाहीत, तसेच बाहेरून येणाऱ्या अनेक पर्यटकांना खायचेही वांदे झाले. खाद्यपदार्थांच्या गाड्या, फळांच्या गाड्या बंद ठेवल्या गेल्या. रस्त्यावर वाहन पार्क करता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्यामुळे ग्राहकांचे थांबणे बंद झाल. माध्यान्हापूर्वीच व्यापाऱ्यांनी दुकानेही बंद केली. यामुळे रात्री उशिरापर्यंत सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. असे पांघरूण घालण्याऐवजी कोल्हापूरची ही अवस्था मंत्र्यांच्या डोळ्यांखालून घातली असती, तर काय बिघडले असते? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT