द्रोणाचार्य पुरस्कार मिळवलेल्या माझ्या शिष्याचा आजच दिल्लीत माझ्या हस्ते सत्कार ठरला होता; परंतु कोल्हापूरकरांच्या निखळ प्रेमाने मला आज अक्षरशः येथे ओढून आणले. येथील जनतेच्या ओथंबून वाहणाऱ्या प्रेमाने मी तृप्त झालो, अशा मनमोकळ्या भावना वस्ताद सतपाल यांनी व्यक्त केल्या. कोल्हापूरच्या मातीचा दरवळ सोडवत नाही, असेही ते म्हणाले. (Kolhapur)
सध्या मी राजधानी दिल्लीत कुस्तीचे प्रशिक्षण देत आहे. आखाड्यात ३०० मल्ल कुस्तीचा सराव करतात, त्यांच्याकडून कसून मेहनत करून घेऊन त्यांच्याकडून बकरी पछाड, हाथी सिंगाड आदी डावांची तयारी करवून घेतो. त्यांच्या खुराकाचीही योग्य ती काळजी घेतो, असे सतपाल यांनी सांगितले. कोल्हापूरच्या मल्ल विद्यापीठाची वाखाणणी करून युवराज या तडाखेबाज मल्लाची अकाली झालेली एक्झीट ही संपूर्ण कुस्ती क्षेत्रात पोकळी निर्माण करून गेली, असे सांगून सतपाल जुन्या आठवणीत रमले. ते म्हणाले, बेळगावच्या लढतीनंतर बिराजदारने लढतीला रामराम ठोकला हे योग्य नाही, हार-जित ही कुस्तीत होतच असते. सध्या गंगावेस तालमीचा मल्ल सिकंदर शेखने उत्तरेच्या मल्लांमध्ये धडकी भरवली आहे, याबाबत विचारले असता सतपाल म्हणाले,सिकंदर हा फारच चांगला कुस्तीगीर आहे त्याचा चांगलाच दरारा आहे. तो आता महाराष्ट्र केसरी झाला आहे आणि त्याचे भवितव्यही उज्ज्वल आहे.
पद्मभूषण महाबली सतपाल म्हणाले, कुस्तीचे कुंभ स्थान म्हणून कोल्हापूरची भारतात ओळख आहे. मी जर कोल्हापूरला आलो नसतो तर इतका मोठा पैलवान झालोच नसतो. कोल्हापूरच्या लोकांनी मला खूप प्रेम दिले आणि आजदेखील मी त्या प्रेमाचा अनुभव घेतला. त्यामुळे मी कोल्हापूरला कधीही विसरू शकणार नाही. कोल्हापूरचे मल्ल गुणी आणि मेहनती आहेत. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहनही सतपाल यांनी केले.
हेही वाचा :