कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि.२३) मतदान झाले. ७ तालुक्यातील ५८ मतदान केंद्रांवर ९१.१२ टक्के चुरशीने व अटीतटीने मतदान झाले. सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. संस्था गटात १२९ पैकी १२८ मतदारांनी मतदान केले. तर १३ हजार ५३८ पैकी १२ हजार ३३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गत निवडणुकीच्या तुलनेत एका टक्क्याने वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार ? याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
कसबा बावडा येथे 975 पैकी 919 (94 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
इचलकरंजी मतदान केंद्रावर एकूण 160 पैकी 155 (97 टक्के) मतदारांनी मतदान केले.
सावर्डे मतदान केंद्रावर सावर्डे, मिणचे व कापूरवाडी या गावांतून २०० पैकी १९८ मतदान (९९ टक्के) झाले.
टोप, संभापूर, कासारवाडी येथे ५६४ पैकी ५०५ मतदान (८९.५३ टक्के) झाले.
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील दत्ताजीराव जाधव हायस्कूलमधील मतदान केंद्रावर एकूण १८५ पैकी १६३ (८८ टक्के) मतदान झाले.
कसबा तारळे (ता. राधानगरी) मतदान केंद्रावर 232 मतदारांपैकी 222 मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर कसबा तारळे, पिरळ, सावर्धन, कुडूत्री येथील मतदारांचा समावेश होता.
रुकडी २८३ पैकी २५५ (९० टक्के) , चोकाक १७६ पैकी १५४ (८७.५ टक्के) , माणगांव १०८ पैकी ९४ (८७.०३ टक्के) या मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. या वेळी मतदान केंद्रांना अमल महाडिक, बंटी पाटील, राजूबाबा आवळे यांनी भेटी दिल्या. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सत्ताधारी महाडिक आघाडीचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सेंट झेवियर्स मतदान केंद्रामध्ये मतदान केले. कसबा बावड्यातील केंद्र क्रमांक ४५ महागावकर विद्यालय येथे सकाळपासूनच मतदानासाठी रांग लागली होती. करवीर (कोल्हापूर शहर) आणि संस्था गटातील मतदान सेंट झेवियर हायस्कूल येथे झाले
छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला होता. शीघ्र कृती दलांसह राज्य राखीव दलाची पथके तैनात करण्यात आली होती. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व 58 मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस अधिकार्यांसह एक पोलिस, एक होमगार्ड अशी पथके तैनात होती. कसबा बावडा, शिरोली, गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, कुंभोज, नरंदे, टोप, शिये, निगवे दुमाला येथील मतदान केंद्रांवरही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा