कसबा बावडा (कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : राजाराम कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आमदार अमल महाडिक यांची तर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी नारायण बाळकृष्ण चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन संचालकांच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे होते. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजाराम साखर कारखान्याची निवडणूक माजी आमदार महादेवराव महाडिक व अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. या निवडणुकीत आ. सतेज पाटील गटाचा धुव्वा उडवत सर्व उमेदवार त्यांनी निवडून आणले. प्रचारामध्ये अमल महाडिक यांनी पायाला भिंगरी बांधून रान उठवले होते. अतिशय संयमी पणाने त्यांनी ही निवडणूक हाताळली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाडिक व पाटील यांच्यातील संघर्ष जवळपास गेल्या दीड दशकापासून सुरू आहे. आ. पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात जिल्ह्यातील नेत्यांची मोट बांधत महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. महाडिक यांच्या ताब्यात असणार्या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये प्रत्येकवेळी त्यांना यश येत गेले. महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ येथील महाडिक यांची सत्ता संपुष्टात आणली. केवळ राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये महाडिक यांची सत्ता राहिली होती. ती सत्तादेखील संपुष्टात आणण्यासाठी आ. पाटील यांनी 'आमचं ठरलंय', 'कंडका पाडायचा' ही टॅगलाईन घेऊन कंबर कसली होती. आ. पाटील यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक होती. परंतु, सभासदांनी सत्तारूढ आघाडीला साथ दिल्यामुळे आ. पाटील यांचाच कंडका पडल्याचे चित्र निकालातून दिसून आले.
हे ही वाचा :