पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातील ९० वर्षाची अविरत कला परंपरा असलेल्या दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट (कोल्हापूर) या कला संस्थेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे भरविण्यात आलेल्या वार्षिक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या अस्मिता जगताप, चित्रकार विजय टिपुगडे, कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे प्रशांत जाधव, संस्थेच्या सचिव प्रा. अर्चना आंबिलोधोक, सुनील पाटील, प्रा. अजेय दळवी, प्रा. संजय गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक आदी मान्यवर उपस्थितीत होते. (Kolhapur )
याप्रसंगी बोलताना असताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, "गेली पाच पिढ्या आमचा कौटुंबिक संबंध आहे. इथून पुढेही हा ऋणानुबंध असाच अखंड राहील. कोल्हापूरच्या कलेला साता समुद्रापार घेऊन जाण्याची जबाबदारी युवा पिढीकडे आहे यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्नशील असेल." पुढे बोलत असताना ते म्हणाले की, "प्रत्येकाकडे एखादी कला असावीच. सध्याची युवा पिढी ही कलेप्रती जास्त जागृत आहे. नवनवीन निर्मितीमध्ये व्यस्त आहे. त्यांच्या कलेचा उपयोग समाज उपयोगी व्हावा. डी. वाय. पाटील समूह नेहमीच कलाकारांचे पाठीशी आहे. इथून पुढे देखील कोल्हापुरातील कलाक्षेत्रासाठी आम्ही भरीव कार्य करू." यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा वर्षभरातील कला कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
हे प्रदर्शन राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक (कोल्हापूर) येथे दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असुन सकाळी ९.३० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. सदर प्रदर्शनामध्ये १२० विद्यार्थ्यांच्या २५० कलाकृती असणार आहेत. यामध्ये मूलभूत अभ्यासक्रम, स्टील लाईफ, व्यक्तिचित्र रचनाचित्र, भारतीय लघुचित्र, मुद्राचित्र, निसर्ग चित्र आदी विषयांच्या कलाकृतींचा समावेश असणार आहे.सदर प्रदर्शनास कला रसिकांनी भेट द्यावी असे आवाहन विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित गडकरी, ऋतुजा जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा