Latest

कोल्हापूर : बांबवडेत बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात; भेडसगावात डॉक्टरचा पथकाला गुंगारा

अविनाश सुतार

सरुड : पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडून शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. संजय बाळकृष्ण शिंदे (वय ५०, रा. भागाईवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) असे या संशयित बोगस डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हिरालाल निरंकारी यांच्या फिर्यादीनुसार संशयित शिंदे याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ चे कलम ३३(२) व ३३ (अ) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोधमोहीम वेगवान केली आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोगस डॉक्टरांची नांवे व कार्यरत ठिकाणांची यादी सादर करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. शाहूवाडी तालुक्यात प्रथमदर्शनी असे सात बोगस डॉक्टर विविध ठिकाणी अवैधरित्या वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाचे लक्ष वेधले आहे. या सर्वांची सखोल चौकशी करून केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरालाल निरंकारी यांना बजावले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डॉ. निरंकारी यांनी संबंधित संशयित ७ जणांना नोटीस बजावली. यामध्ये 'आपण अवैधरित्या करीत असलेला वैद्यकीय व्यवसाय तत्काळ बंद करावा, तसे न केल्यास किंबहुना पूर्वसूचना देऊनही अवैद्य वैद्यकीय व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संबंधित बोगस डॉक्टरला इशारा दिला होता. तथापि डॉ. निरंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस डॉक्टर शोध पथकाने संबंधितांवर गोपनीय यंत्रणेच्या माध्यमातून पाळत ठेवली होती. यामध्ये 'त्या' सातपैकी संशयित दोघेजण अद्यापही अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली.

बांबवडे येथील सरुड फाट्यानजीक व्यावसायिक इमारतीच्या गाळ्यात संजय शिंदे हा रुग्णांची तपासणी तसेच सलाईन लावताना भरारी पथकाच्या जाळ्यात सापडला. त्याचवेळी भेडसगांव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावात कार्यरत बोगस डॉक्टर भरारी पथकाला गुंगारा देण्यात यशस्वी ठरला. त्यालाही लवकरच पकडण्यात यश मिळेल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंकारी यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले.

संशयित शिंदे याच्याकडे केलेल्या पडताळणीमध्ये वैद्यकीय व्यवसाय पूरक साहित्य आढळून आले. याशिवाय अधिकृत वैद्यकीय शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, वैद्यकीय व्यवसायाचा परवाना आदी कोणताही दस्तऐवज उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय याआधीही शिंदे यांच्याविरोधात बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई झालेली आहे. यामध्ये फिर्यादी व्यक्तीने तक्रार मागे घेतल्यामुळे मनोबल उंचावलेल्या शिंदे याने 'मुन्नाभाई'च्या वेशात पुन्हा एकदा कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

लोकसेवकांचा यंत्रणेवर दबाव

दरम्यान, बोगस डॉक्टर शोध पथकाने राबविलेल्या मोहिमेत बांबवडे परिसरातील एका गावात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बोगस डॉक्टरला 'सेवा' बंद करण्याचे फर्मान सोडल्यावर नेहमीप्रमाणे 'लोकसेवक' बोगस डॉक्टरवरील कारवाई टाळण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणू पाहत होते. मात्र, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना भयमुक्त धडक कारवाईचे अभय मिळाल्याचे पाहून हे लोकसेवक काहीसे हतबल झाल्याचे चित्र दिसून आले. 'मानवी जीविताशी उघडपणे खेळणाऱ्या अवैध तथा बोगस डॉक्टरांविरुद्ध समाजाने जागृत असायला हवे. प्रशासनाच्या बोगस डॉक्टर शोध मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, यामध्ये संबंधितांचे नाव गोपनीय राखले जाईल.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT