कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा राजाराम कारखान्याच्या निवडणूक यंत्रणेवर भाजपचा दबाव असल्याचा आरोप अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी केला. कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परिवर्तन आघाडीच्या २९ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरवले, तोच निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कायम ठेवला आहे. वेळेत निर्णय द्यावा म्हणून केवळ तारखेची औपचारिकता ठेवली आणि मध्यरात्री निकालाची प्रत दिली. निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय कॉपी पेस्ट केला आहे, बहुदा संगणकही एकच असावा असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील म्हणाले, प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. आमच्या परिवर्तन आघाडीला सभासदांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आघाडीचे २९ उमेदवार अपात्र ठरविले असले तरी आमच्याकडे पॅनेलसाठी आवश्यक २१ उमेदवारांची तयारी आहे. विरोधकांना आता केवळ २१ नाही तर आमच्या पन्नास उमेदवारांशी लढत द्यावी लागणार आहे, असे आव्हानही त्यांनी यादरम्यान दिले.
राजाराम कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी २९ मार्च रोजी एकतर्फी निर्णय दिला. परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांनी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करता दिलेला हा निर्णय दुर्दैवी होता. उच्च न्यायालयात दाद मागण्यापूर्वी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे अपील करणे क्रमप्राप्त होते, त्यामुळे आम्ही ते नियमानुसार ३१ मार्च रोजी दाखल केले. प्रादेशिक सहसंचालक (साखर) अशोक गाडे यांनी तोच निर्णय देण्यासाठी दहा दिवसांचा विलंब केला, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर भाजपाचा दबाव असल्याचा पुनरुच्चार त्यांनी आमदार पाटील यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, महाडिक भ्याले, त्यामुळे त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आमचे उमेदवार अपात्र करण्याचा रडीचा डाव खेळला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. सहकारातील हा निर्णय दुर्दैवी असून तो संपूर्ण राज्याला लागू होणार आहे, यापुढे ज्याच्या हातात दप्तर तो मालक होणार आहे. पत्रकार परिषदेवेळी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने, बाळासाहेब पाटील यांच्यासह बहुतांश अपात्र उमेदवार उपस्थित होते.
हेही वाचा :