आजरा : पुढारी वृत्तसेवा, गवसे येथील आजरा तालूका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव धुरे यांची तर उपाध्यक्षपदी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष एम. के. देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे होते. (Kolhapur)
कारखाना निवडणूकीत राष्ट्रवादीच्या श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली. कारखाना आर्थिक संकटात असल्याने कारखान्याच्या पदाधिकारी निवडीला महत्व प्राप्त झाले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ,माजी आमदार के पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. याबाबत सर्व संचालकांशी सोमवारी चर्चा करण्यात आली होती.
निवडणूकीनंतर पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पहिलीच संचालक मंडळाची सभा कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात पार पडली. पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिलेला बंद पाकिटातील नावे खोलण्यात आली.यामध्ये अध्यक्ष म्हणून वसंतराव धुरे व उपाध्यक्ष म्हणून एम. के. देसाई यांची निवड करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार धुरे व देसाई यांची निवड करण्यात आली. यावेळी धुरे म्हणाले, कारखाना सद्यस्थितीत अडचणीत असला तरीही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसर व पारदर्शक पद्धतीने कारभार केला जाईल. कर्जमुक्तीच्या दिशेने आवश्यक ते प्रयत्न केले जातील. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,मुकुंदराव देसाई,विष्णूपंत केसरकर,उदय पवार,रणजीत देसाई,अनिल फडके,दिपक देसाई,राजेंद्र मुरूकटे,रचना होलम,हरिबा कांबळे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी वर्ग, नूतन संचालकांचे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुरे यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. त्यांना अध्यक्षपदाचा अनुभव आहे, तर देसाई हे देखील अनुभवी संचालक आहेत.देसाई यांना पहिल्यांदाच उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे.
हेही वाचा