बिद्री : पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील बोरवडे गावच्या दक्षिणेला पठार नावाच्या शिवारात अज्ञात व्यक्तींनी ७ ते ८ दगडी मुर्ती रंगवून उभ्या केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले आहे. या मुर्तींना भगवे फेटे व साड्या नेसवून त्यांना हार घालून पूजा करण्यात आली आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार झाल्याची गावात चर्चा असून ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Kolhapur News)
एकीकडे देशाची विज्ञान व तंत्रज्ञानात भरारी होत असताना अंधश्रध्देतून भानामती, काळी जादू याचा पगडा अजून ही कांही लोकावर असल्याचे दिसून येत आहे. करणी, बाधा या प्रकारातून समाजात वेगवेगळ्या विकृत्या पहावयास मिळत आहेत. यामुळे सामाजिक स्तरावरील अशा घटनामुळे अंधश्रध्देला खतपाणी मिळत असल्याचे दिसते.
बोरवडे गावच्या दक्षिणेला कालव्याच्या वरच्या बाजूला पठार नावाच्या शिवारात चार ते पाच दिवसापूर्वी रात्रीच्यावेळी या मुर्तीचे पूजन केलेले ग्रामस्थांना आढळून आले आहे. या मुर्तींना शेंदूराने रंगवून भगवे फेटे नेसविण्यात आले आहेत. गावाकडे तोंड करून या दगडी मुर्ती ठेवण्यात आल्या आहेत. मुर्तीच्या पाठीमागे भगवा झेंडा रोवला आहे. मुर्तींची पूजा-अर्चा केलेले साहित्य जवळच विखुरले आहे. भानामतीचा प्रकार असून त्या रात्री ढोल वाजल्याचे ग्रामस्थांत चर्चा आहे. शेताकडे गवत कापण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. गावावर रोगराईचे संकट येईल. अशी भीती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग शेती कामासाठी जाण्यास भीती व्यक्त करीत आहेत. अंधश्रद्धेतून हा प्रकार झाला आहे. अशी ही नागरिकांत चर्चा आहे. (Kolhapur News)
अज्ञात व्यक्तींनी या दगडी मुर्ती ठेवल्या असून हार घालून पूजल्याचे निदर्शनास आले आहे. हे दगड या परिसरातील नसून बाहेरून आणल्याचे दिसते. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. हा अंधश्रद्धेचा प्रकार असून नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असा कोणी प्रकार केला आहे. याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
विनोद वारके, उपसरपंच, बोरवडे
हेही वाचा