संग्रहित छायाचित्र 
Latest

पुण्यात किडनी रॅकेटचा भांडाफोड; कोल्हापूरच्या महिलेची काढली किडनी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर येथील महिलेला एंजटाच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला पैशांचे आमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनीकमध्ये हा प्रकार घडला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटासोबतचा आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा तस्करीचा प्रकार उजेडात आला. दरम्यान, रूबी हॉल प्रशासनानेही या प्रकरणाबाबत पोलिसांत धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारिका गंगाधर सुतार ही कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे राहते. तेथे ती हॉटेलमध्ये चपात्या लाटून आपल्या दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळते. पतीने काही वर्षापूर्वीच तिची साथ सोडली आहे. तिच्या डोक्यावर कर्ज असल्याने व मुलांच्या भविष्याच्या चिंतेने सतत तणावात असायची. याच दरम्यान वर्षभरापूर्वी तिला एक महिला भेटली तिने तिची पैशाची गरज ओळखून रविभाऊ नावाच्या एंजंटाची ओळख करून दिली.

बनावट कागदपत्राद्वारे दाखविले रुग्णाची पत्नी

या एजंटने तिच्यासमोर पैशाच्या बदल्यात तिची किडनी पुण्यातील साळुंके नावाच्या व्यक्तीला विकण्याचा प्रस्ताव ठेऊन तिला 15 लाख रूपये मिळतील असे आश्वासन दिले. तसेच एका किडनीवरही तु जिवंत राहु शकते असे सांगितले. 15 लाख रूपये मिळणार म्हणून सारिका सुतार हिने देखील किडनी देण्यास होकार दर्शविला. दरम्यान वर्षभरापासून संबंधीत महिला पुण्यात येत होती. तिच्या रक्ताचा गटही किडनी आवशक असलेल्या साळुंके नावाच्या व्यक्तीसोबत जुळला.

किडनीचा हा तोंडी व्यवहार एंजटा मार्फत झाला होता. मात्र, किडनी ही जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. यासाठी सारिका हिला साळुंके या व्यक्तीची पत्नी दर्शविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बनावट बनविण्यात आली. त्यामध्ये सारिका यांचे नाव शोभा साळुंके असे कागदोपत्री करण्यात आले. त्यांनी तसे लेखी संबंधित किडनी प्रत्यारोपन समितीकडेही कबुल केले. गेल्या आठवड्यात याच कागदपत्राच्या आधारे सारिका हिची किडनी काढून एका किडनी आवशक असलेल्या 19 वर्षीय तरूणीला देण्यात आली. त्या तरूणीच्या आईची किडनी साळुंके यांना बसविण्यात आली. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

असा प्रकार आला उजेडात

या दरम्यान संबंधित रूग्ण साळुंके याची खरी पत्नीही हॉस्पीटल मध्ये तिची विचारपूस करण्यासाठी येत- जात होती. एंजटने रूग्णालयात येऊन त्यांची भेट घेतल्याचे सारिका यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिका हिने तिच्या बहिणीला एजंट रवीभाऊने पैसे दिले का? अशी विचारणा केली. त्यावर रवीभाऊने केवळ 4 लाख रूपये देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. परंतु, ठरल्या प्रमाणे पंधरा लाख रूपये न मिळाल्याने त्यांच्यातील झालेला तोंडी व्यवहार फिस्कटला. त्यानंतर सारिका व नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी यासंबंधी तक्रारही घेतली असून सध्या या प्रकरणाचा तपास सूरू आहे.

रवीभाऊने यापूर्वीही असे प्रकार केलेत का?

किडनी प्रत्यारोपणात गरीब महिलेला पुण्यात आणून तिची किडनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असताना या रवीभाऊने यापूर्वीही अशाप्रकारे किडनी तस्करी केली आहे का, याचाही शोध घेणे महत्वाचे ठरणार आहे.

रूग्णालयाच्या सीसीटिव्हींनी रवीभाऊची छबी टिपली असण्याची शक्यता

कोल्हापूर येथील किडनी देणार्‍या महिलेला भेटलेला रवीभाऊ हा पुण्यातील असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्याने रूग्णालयातही येऊन तिची भेट घेतल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्याने जर हॉस्पीटलमध्ये संबंधीत महिलेची भेट घेतली असल्यास सीसीटिव्हीमध्ये त्याची छबी टिपली गेल्याची शक्यता आहे.

चुकीच्या पध्दतीने किडनी प्रत्यारोपण झाल्याबाबत आमच्या पोलिस ठाण्याला तक्रार अर्ज आला आहे. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. हे प्रकरण सध्या ससून रूग्णालयाच्या समितीकडे तसेच पुणे आरोग्य उपसंचालकांकडे अभिप्रायासाठी पाठविले आहे. त्यांच्या अभिप्रायानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

                                – विनायक वेताळ, वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क पोलिस ठाणे.

हे प्रकरण किडनी प्रत्यारोपण स्वॅपिंग प्रकरणातील आहे. यामध्ये संबंधित महिलेने एका तरूणीला किडनी दिली व त्या तरूणीच्या आईने या महिलेने तिचा पती म्हणून दाखवलेल्या व्यक्तीला किडनी दिली आहे. मात्र, तिने नंतर तो तिचा पती नाही आणि कबुल केलेले पैसे दिले नाहीत म्हणून पोलिसांत तक्रार दिली. हे आम्हाला कळल्यावर आम्ही देखील हॉस्पिटलची फसवणुक झाल्याची या महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणात हॉस्पिटलकडून व ससून रुग्णालयाच्या विभागीय समितीकडून सर्व कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करून किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली आहे. यामध्ये हॉस्पिटलचा कोणताही दोष नाही.

                                 – अ‍ॅड. मंजूषा कुलकर्णी, विधी सल्लागार, रूबी हॉल क्लिनिक

आम्हाला पोलिसांकडून किडनी प्रकरणात अभिप्राय देण्यासंबधी मागणी केली आहे. मात्र हे प्रकरण पाहता याबाबतचा निर्णय आमच्या स्तरावर घेऊ शकत नसल्याने आम्ही ते प्रकरण राज्याच्या आरोग्य सहायक संचालकाकडे पाठविले आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल.

                                           – डॉ. संजोग कदम, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT