बेळगाव : पुढारी वृत्तसेवा, कर्नाटकात क्रमांक एकचा मतदारसंघ असलेल्या निपाणीत राष्ट्रवादी खाते उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या भाजपकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. प्राथमिक फेरीत उत्तम पाटील यांनी विद्यमान आमदार शशिकला जोल्ले आणि काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्यावर सुमारे एक हजार मतांची आघाडी घेतली आहे. (Karnataka Election Results 2023)
महत्वाचे म्हणजे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या उत्तम पाटील यांना राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. शिवाय प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली होती. राष्ट्रवादीने कर्नाटकातील २२४ पैकी एकूण ९ जागा लढवल्या असून निपाणीतून उत्तम पाटील अशीच आघाडी कायम राखतात का हा आता प्रश्न आहे.
किमान दोन जागा मिळण्याची अपेक्षा असलेली महाराष्ट्र एकीकरण समिती सध्या पिछाडीवर आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघात भाजपचे अभय पाटील २ हजार मतांनी आघाडीवर आहेत तर समितीचे रमाकांत कोंडुस्कर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील अशी स्थिती असून इथे काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर आघाडीवर आहेत. म. ए. समितीचे आर्यन चौगुले दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर भाजपचे नागेश मनोळ तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
खानापूर मतदारसंघातही समिती पिछाडीवर असून, इथे भाजपच्या विठ्ठल हलगेकर यांनी काँग्रेसच्या विद्यमान आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्यावर सुमारे १२ हजार मतांची आघाडी घेतली आहे. इथे समितीचे मुरलीधर पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (Karnataka Election Results 2023)
हे ही वाचा :