Latest

Karnataka Election 2023 : दोन वर्षांसाठी दरमहा तीन हजार बरोजगारी भत्ता; कर्नाटकात राहुल गांधींची मोठी घोषणा

अमृता चौगुले

बेळगाव; पुढारी ऑनलाईन : २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत, यासाठी पक्ष जोरदार तयारी करत आहे. काँग्रेस निवडणुकीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही, याच अनुषंगाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक गाठत राज्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात राहुल गांधी यांनी बेळगावात पहिली सभा घेतली. (Karnataka Election 2023)

२ वर्षांसाठी बेरोजगारांना दरमहा ३००० रुपये (Karnataka Election 2023)

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकात दोन वर्षांसाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा ३,००० रुपये देण्याची मोठी घोषणा केली. ते बेळगावमध्ये म्हणाले, "बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा ३,००० रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी १,५०० रुपये प्रति महिना देणार आहे."

२०० युनीट मोफत वीज

तसेच राहुल गांधींनी कर्नाटकात २०० युनीट मोफत वीज देण्याची घोषणाही केली आहे, मात्र ही घोषणा करताना ते गडबडले आणि दोनशे युनीटऐवजी दोन हजार युनीट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले. (Karnataka Election 2023)

१० लाख खासगी नोकऱ्या देणार

यासोबतच १० लाख खासगी नोकऱ्या देण्याचे आणि २.५ लाख रिक्त सरकारी पदे भरण्याचे आश्वासन राहुल गांधींनी दिले. कर्नाटकातील बेळगाव येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, कर्नाटक सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. कोणतेही काम करण्यासाठी ४० टक्के कमिशन घेतले जाते. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहिले, पण त्यांनी काहीच केले नाही, असे राहुल म्हणाले. आमदार मुलाकडून आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

२.५ लाख सरकारी पदे भरली जातील

राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास दहा लाख तरुणांना रोजगार दिला जाईल आणि अडीच लाख सरकारी जागाही भरल्या जातील, अशी मोठी निवडणूक घोषणा राहुल गांधी केली. काँग्रेसने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचाही राहुल यांनी पुनरुच्चार केला आणि महिलांना दरमहा दोन हजार रुपये आणि गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ मिळणार असल्याचे सांगितले.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT