Latest

Karnataka CM decision | कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? डी. के. शिवकुमार की सिद्धरामय्या, आज घोषणा, दोघांनाही दिल्लीत बोलावले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करणार आहेत. त्यापूर्वी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख डी. के. शिवकुमार आणि वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षात चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते सिद्धरामय्या आज नवी दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख डी. के. शिवकुमार हे देखील आज दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी भेट घेणार असल्याचे समजते. शिवकुमार आणि सिद्धरामय्यांना या दोघांनाही काँग्रेस श्रेष्ठींना दिल्लीला सोमवारी पाचारण केले आहे. त्यानुसार दोन्ही नेते आज दिल्लीला जाणार आहेत. (Karnataka CM decision)

याबाबत डीके शिवकुमार यांना आज दिल्ली भेटीबद्दल विचारले असता त्यांनी, "दिल्लीला जायचे की नाही हे अजून ठरवले नाही' असे म्हटले आहे. डी. के. शिवकुमार यांचा आज ६२ वा वाढदिवस असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. पण यात डीके शिवकुमार यांचे पारडे जड आहे. यातील एकाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्याचे काम काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपवण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मोठा विजय हा जनतेने त्यांना दिलेली सर्वोत्तम वाढदिवसाची भेट असल्याची भावना शिवकुमार यांनी व्यक्त केली आहे. "माझे जीवन कर्नाटकातील लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहे", असे ८ वेळा आमदार म्हणून निवडून शिवकुमार यांनी सोमवारी आपला ६२ वा वाढदिवसानिमित्त म्हटले.

"माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कर्नाटकच्या जनतेने मला सर्वोत्तम अशी वाढदिवसाची भेट दिली. काँग्रेस परिवाराकडून मिळालेल्या हार्दिक शुभेच्छांसाठी आभार," असेही त्यांनी पुढे नमूद केले.

कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवून निवडून आलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, ३९ लिंगायत आमदारांची पसंतीच पुढचा मुख्यमंत्री ठरवेल, अशी शक्यता आहे. त्यानुसार अधिकाधिक आमदारांनी डी. के. शिवकुमारांना पसंती दर्शवल्याचे समजते. तर उपमुख्यमंत्री सतीश जारकीहोळी यांची निवड होऊ शकते. मात्र काही लिंगायत तसेच दलित आमदारांनी सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे. हा पेच सोडवण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र आमदारांत एकमत न झाल्याने गटनेता निवडण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींकडे सोपवण्याचा ठराव विधिमंडळ बैठकीत झाला. (Karnataka CM decision)

रविवारी रात्री काँग्रेसच्या १३५ आमदारांची बैठक येथील खासगी हॉटेलमध्ये झाली. बैठकीपूर्वी हॉटेलच्या बाहेर शिवकुमार आणि सिद्धरामय्या दोघांचेही सुमारे पाच हजार समर्थक जमले होते. आपल्याच नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा ते देत होते. दोन्ही नेत्यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन करून विधिमंडळ बैठकीत निर्णय होईल असे सांगितले.

बंगळूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेसचे निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, पक्षाचे सरचिटणीस जितेंदर सिंग, माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्या नेतृत्वाखाली रात्री राज्यातील सर्व आमदारांची बैठक झाली. बैठकीत सर्व आमदारांशी चर्चा करुन त्यांची मते घेऊन विधिमंडळाचा गटनेता निवडून मुख्यमंत्री निवडला जाणार होता. पण या बैठकीत सर्व आमदारांनी सर्वानुमते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांडने घ्यावा, असा ठराव करत सर्वाधिकार पक्षाध्यक्षांकडे सोपवण्याचा एका ओळीचा ठराव केला. त्यानुसार शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांनीही राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीला पाचारण केले आहे. आता दिल्लीतील नेत्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुल गांधींचा मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्यांना पाठिंबा

दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधींचा मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांना पाठिंबा आहे. कारण सिद्धरामय्या हे राज्यात पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीला होईल, असे त्यांना वाटते. सध्या सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करुन, लोकसभा निवडणुकीनंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार राहुल यांचा आहे. (karnataka cm announcement)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT