Latest

Kapil vs Ashwin : कपिल देव भडकले, म्हणाले; ‘अश्विनला स्वत:लाच लाज वाटत…’

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : Kapil vs Ashwin : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने सुपर 12 फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकले आणि 8 गुणांसह अव्वल 4 मध्ये स्थान मिळवले. आता उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना 10 नोव्हेंबरला अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंडशी होणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

आर अश्विनला पाचही गट सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्याने 7.52 च्या इकॉनॉमी रेटने धावा देत 5 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. परंतु कपिल देव त्याच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. अश्विनबद्दल ते म्हणाले की, 'मी अश्विनवर विश्वास ठेवू अशी खास कामगिरी त्याने अजूनपर्यंत केलेली नाही. अश्विनने विकेट जरून घेतल्या, पण त्या विकेट त्याने घेतल्याचे मला कुठेच जाणवले नाही. खरे तर फलंदाजच अशा पद्धतीने बाद झाले की अश्विनला स्वत:लाच 1-2 विकेट घेण्याची लाज वाटली असेल, त्यामुळे तो आपला चेहरा लपवत होता,' अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Kapil vs Ashwin)

उपांत्य फेरीत चहल की, अश्विन? कपिल यांनी दिले प्रत्युत्तर

कपिल देव पुढे म्हणाले की, 'विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. पण ज्या अश्विनला आपण ओळखतो, तो या वर्ल्ड कपच्या 5 सामन्यात कुठेच लयीत दिसलेला नाही.' इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत अश्विनला संधी मिळणार की त्याच्या जागी युझवेंद्र चहल संघात खेळणार, याबाबत विचारले असता त्यांनी, हा निर्णय संघ व्यवस्थापनावर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले. संघ व्यवस्थापनाला अश्विनवर विश्वास असेल ते त्याला पुढील महत्त्वाच्या सामन्यांत खेळवतील. तो संपूर्ण स्पर्धेत खेळला आहे आणि आवश्यकतेनुसार गोष्टी योग्य प्रकारे करू शकतो. दुसरीकडे, जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला धक्का द्यायचा असेल तर तुम्ही रिस्ट स्पिनर चहलचा वापर करू शकता. पण शेवटी कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा ज्याच्यावर अधिक विश्वास असेल त्यालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल,' असेही मत कपिल देव यांनी मांडले. (Kapil vs Ashwin)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT