Latest

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा तटस्थ राहण्याचा निर्णय

अमृता चौगुले

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शरद पवार हे आमचे दैवत आहे, तर अजित पवार यांच्या माध्यमातून 2004 नंतर तालुक्यात अनेक विकासकामे झाली असून, यापैकी काही कामे प्रगतिपथावर आहेत. आमच्या बेनके परिवाराला हे दोन्हीही नेते महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबरोबर आमचा इतिहास जोडला आहे. मी सध्या द्विधा मन:स्थितीत असल्यामुळे मी कोणासोबत जायचं याबाबतची माझी भूमिका तटस्थ असून, मी 2024 विधानसभा निवडणूकही लढवणार नसल्याचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

बेनके यांच्या या निर्णयाने मागील सहा दिवसांपासून चाललेल्या नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला. रविवारी ( दि. 9) बेनके यांच्या निवासस्थानी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजने, विकास दरेकर, विनायक तांबे, बाळासाहेब खिलारी, उज्ज्वला शेवाळे, ज्योती संते, वैष्णवी चतुर, अक्षदा मांडे उपस्थित होते.

2 जुलै रोजी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर तब्येत नादुरुस्त असल्याने आपली भूमिका जनतेला सांगू शकलो नसल्याने पत्रकार परिषद घेण्यापूर्वी बेनके यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची बैठक घेऊन निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

वडील माजी आमदार वल्लभ बेनके हे शरद पवार यांच्याबरोबर राजकारणात उतरून समाजकारण करताना शरद पवार यांनी त्यांना सहा वेळा जुन्नर विधानसभेची उमेदवारी दिली, त्यामध्ये ते चार वेळा विजयी झाले, तर मला दोन वेळा उमेदवारी घेऊन एकदा आमदारकी मिळाली. माजी आमदार वल्लभ बेनके यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लावली. यामध्ये शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धरणे, कालवे, बंधारे या माध्यमातून शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले. वल्लभ बेनके यांना दोन वेळा मंत्रिपद चालून आले होते. मात्र, दोन्ही वेळा त्यांना हुलकावणी मिळाली, तरीही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही.

दरम्यान, अजित पवार यांनी 2004 नंतर जुन्नर तालुक्याला भरीव मदत केली आहे. त्यामध्ये चिल्हेवाडी धरणाच्या पाइपलाइनचा प्रश्न असेल, शिवनेरी विकास आराखडा, पिंपळगाव जोगा धरण, येडगाव धरण येथील यशवंतराव चव्हाण स्मारक, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, हिरडा उत्पादकांचा प्रश्न, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकर्‍यांसाठी शून्य टक्के व्याजदराने पुरवठा याचबरोबर कोविड काळात मोलाची मदत केली. त्यामुळे अजित पवारही मला तितकेच महत्त्वाचे आहेत.

वडील वल्लभ बेनके यांची तब्येत ठीक नसताना दिलीप वळसे पाटील हे वडिलांसारखे मार्गदर्शन करत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता मला निर्णय घेणे अवघड जात असल्याने मी माझी भूमिका तटस्थ ठेवत आहे, असे बेनके यांनी सांगितले. मात्र, मी राष्ट्रवादी पक्ष व पक्षाची विचारधारा सोडणार नाही. माझे आमदारकीचे एक वर्ष बाकी आहे. तेवढ्या काळात मी पूर्ण ताकद लावून जुन्नर तालुक्यातील विकासकामे करणार असल्याचे सांगतानाच मी 2024 ची विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे बेनके यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT