मुंबई : पुढारी डेस्क : रत्नागिरीतील पेट्रोकेमिकल्स रिफायनरी (आरआरपीसीएल) प्रकल्पाविरोधात लिखाण केलेले पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या ठरवून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. वारिशेंच्या हत्येआधी आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने एकाला फोन करून 'आज मी याचे काम तमाम करणार' अशी भाषा वापरल्याचे संभाषणच आंबेरकरच्या फोनमध्ये पोलिसांना सापडले. ( Shashikant Warishe murder )
संबंधित बातम्या
'महानगरी टाईम्स' या मराठी दैनिकाचे वार्ताहर शशिकांत वारिशे यांची 6 फेब्रुवारी 2023 ला हत्या झाली होती. पंढरीनाथ आंबेरकर याने वारिशे यांच्या स्कूटरला एसयूव्हीने धडक देत त्यांना चिरडल्याचा आरोप आहे. सध्या आंबेरकर खून व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांसह तुरुंगात आहे.
वारिशे यांच्या हत्येशिवाय आंबेरकरवर रिफायनरीच्या आंदोलकांना मारहाण व धमकावल्याचे आणखी चार गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये त्याने कुंभवडेतील मनोज मयेकर यालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनोजवर नंतर कोल्हापुरात दोन आठवडे उपचार सुरू होते.
झडतीत आंबेरकरकडे पोलिसांना पेन ड्राईव्ह सापडला होता. या पेनड्राइव्हमध्ये वारिशे यांनी लिहिलेले अनेक लेख आहेत. विरोधात बातमी छापल्याबद्दल वारिशेला संपवणार, असे मराठी संभाषण असलेले फोन रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागले आहे.
वारिशे यांच्या कथित हत्येच्या दोन तास आधी आंबेरकर एकाशी फोनवर बोलला होता. 'एकाचे काम तमाम करायचे आहे (मला कुणाला तरी संपवायचे आहे). आज त्याचे काम तमाम करणार आम्ही (मी आज त्याला ठार मारेल)', असे त्यांच्यात संभाषण झाले होते. हे कॉल रेकॉर्डिंग आंबेरकरच्या फोनमध्ये सापडले आहे, असेही पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
वारिशे हे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे शेतकर्यांच्या होणार्या नुकसानीवर सातत्याने लिखाण करायचे. मृत्युपूर्वी वारिशे यांनी आंबेरकरांच्या गुन्हेगारी कृत्यांवर प्रकाश टाकणार्या लेखासह त्याच्या राजकीय नेत्यांसोबतच्या बॅनर्सची छायाचित्रे प्रकाशित केली होती. त्याने वारिशे यांना त्यांच्या व बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीविरोधात न लिहिण्याची धमकीही अनेकदा दिली होती.
आरोपपत्रानुसार, पंढरीनाथ आंबेरकर हा नियोजित रिफायनरी प्रकल्पाचा समर्थक होता. त्याने या प्रकल्पाच्या परिसरात स्वत: तसेच नातेवाईकांच्या नावे जमीन खरेदीचे व्यवहारही केले होते. ( Shashikant Warishe murder )
आंबेरकरने आरआरपीसीएलला लॉजिस्टिक सेवा पुरवल्या होत्या. आंबेरकरच्या मालकीच्या साई कृपा ट्रॅव्हल्सला आरआरपीसीएलने डिसेंबर 2022 मध्ये 4.44 लाख रुपये दिले होते, असे रत्नागिरीतील पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने सांगितले आहे.
शशिकांत वारिशे यांचे कुटुंब राजापूरच्या दुर्गम कशेळी गावात छोट्याशा घरात राहते. त्यांची वृद्ध आई आजही न्यायाची प्रतीक्षा करीत आहे. 'माझ्या मुलाला न्याय हवा आहे. त्याचा मारेकरी तुरुंगातून बाहेर पडू नये. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यामुळे माझा मुलगा गेला. त्यालाही असाच मृत्यू यावा', असे शशिकांतची आई शेवंती रडत सांगत होत्या.
माझा मुलगा या रिफायनरीमुळे मरण पावला. ही रिफायनरी आम्हाला इथे नको. माझा मुलगा सकाळी घर सोडायचा आणि रात्री परतायचा. त्याने कामाला वाहून घेतले होते. काळजीपोटी मी त्याला रात्री लवकर घरी ये म्हणायचे. यावर तो काळजी करू नका. मी लोकांच्या भल्यासाठी काम करतोय, असे उत्तर द्यायचा, असे शेवंती सांगत होत्या.
राज्य सरकारने शेवंती व शशिकांत यांचा मुलगा यश यांच्या संयुक्त खात्यात 25 लाख रुपये मुदत ठेव म्हणून जमा केले आहेत. सध्या त्यांना या रकमेवर मासिक 14 हजार रुपये व्याज मिळते.