कोरोना… हा शब्दही उच्चारायला नको आणि त्याची आठवणही नको… अशी आज अनेकांची मानसिकता असेल आणि ती स्वाभाविकही आहे; पण परिस्थिती तशी नाही, कारण केरळमध्ये काेराेनाचे काही रुग्ण नव्याने सापडले आहेत. Covid Strain JN.1 हा फारसा त्रासदायक नसल्याचे सध्या तरी आढळले आहे; पण खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
चार वर्षांपूर्वी अगदी याच महिन्यात, म्हणजे डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात चीनच्या हुआन प्रांतात कोविड-19 चा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतरचा इतिहास जवळपास सर्वांना ठाऊक आहे; पण गेली दीड-दोन वर्षे कोरोना हळूहळू विस्मरणात जावा, अशी सर्वांची मनोमन इच्छा असूनही पोस्टकोविड आणि लाँग कोविडचा त्रास सोसणार्या काहींना कोविडची सतत आठवण आहे; पण ज्यांना कोरोना झाला नाही, अशा व्यक्तींची चिंता कदाचित वाढली असेल, कारण कोरोना पुन्हा आला आहे… केरळमध्ये. पण, मुळीच घाबरून जाऊ नका. विनाकारण काळजीही करू नका; मात्र काळजी जरूर घ्या. केरळमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाचे 1600 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. परवा एका दिवसात शंभरहून अधिक रुग्णांची नोंद झाली आणि कालपर्यंत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला.
गेल्या चार वर्षांत कोविडचे अनेक उपप्रकार आले आणि गेले. केरळमध्ये सापडलेला कोविडचा हा उपप्रकार म्हणजे 'जेएन.1' होय. कोविडच्या अखेरच्या लाटेमध्ये ओमायक्रॉन नावाचा उपप्रकार सर्वांनी अनुभवला होता. या विषाणूमुळे कोणाला फारसा त्रास झाला नव्हता. याचा मृत्युदरही खूप कमी होता. त्यामुळे अनेकांनी त्यावेळी कोविड चाचण्यासुद्धा केल्या नाहीत. 'जेएन.1' हा ओमायक्रॉन प्रकारासारखा वेगाने पसरणारा विषाणू आहे; पण हा फारसा त्रासदायक नसल्याचे सध्या तरी आढळले आहे. 'जेएन.1' हा विषाणू आणि 'बीए 2.86' (पिरोला) हा कोविडचा उपप्रकार यांच्यात साम्य असल्याचे आढळून आले आहे. विषाणूवरील स्पाईक प्रोटिन्सच्या रचनेवरून हे साम्य ओळखले जाते. अशा प्रकारचा पहिला रुग्ण अमेरिकेमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये सापडला होता. त्यानंतर चीन आणि इतर देशांत असे रुग्ण सापडले. गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये या रुग्णांची संख्या तब्बल 32 हजारांवर गेली आणि त्यानंतर दररोज साडेतीनशे ते साडेचारशे नवीन रुग्णांची भर पडल्याची वार्ता आहे. या कोविड रुग्णांमध्ये ताप, सर्दी- नाक गळणे, घसादुखी, डोकेदुखी आणि पोटाच्या किरकोळ तक्रारी अशी लक्षणे यात दिसून येतात. काही वेळा पोटाच्या तीव्र तक्रारी जाणवतात. हे रुग्ण गंभीर होऊ शकतात.
इन्फ्लुएंझासारखे आजारपण (ILI – Influenza Like Illness) आणि श्वसनसंस्थेचा जलद गतीने तीव्र जंतुसंसर्ग (SARI – Severe Acute Respiratory Infection) ज्यांना आहे, अशा रुग्णांची कोविड -19 साठी चाचणी केली जाते आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने 'संपूर्ण जनुकीय अनुक्रम चाचणी' (WGS – Whole Genome Sequencing ) साठी पाठवले जातात. त्यावरून कोविडचा उपप्रकार समजतो.
सध्या जी कोविडची साथ आहे, त्यातील बहुतेक रुग्णांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे दिसून येतात. श्वसनसंस्थेमधील प्रादुर्भाव फार कमी रुग्णांमध्ये दिसून येतो आणि यापैकी मोजक्या रुग्णांनाच रुग्णालयात दाखल व्हावे लागते. या कोविडचा मृत्युदर अत्यंत कमी असून तो केवळ 0.5 टक्का इतका असल्याचे सध्या आढळून आले आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसर्या साथींसारखा हा गंभीर नसल्याने कुणी घाबरून जायचे कारण नाही; पण त्याचवेळी गांभीर्याने स्वतःची काळजी घेणे, ही थंडीच्या वातावरणात कोणत्याही श्वसन विकारांपासून दूर राहण्यासाठी गरजेची बाब आहे.
कोरोना रुग्ण वाढण्याच्या या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक पावले उचलली आहेत. कोरोनासद़ृश लक्षणे आढळली तर तातडीने उपचार घेण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यांना आरटीपीसीआर किंवा अँटिजेन चाचणी करण्यासाठी जास्तीत जास्त सेंटरमध्ये सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांच्या जिल्हानिहाय नोंद ठेवणे आणि लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने उपचार देणे याविषयीही या यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.
आता आवाहन आपल्या सर्वांसाठी – गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा अशा ठिकाणी मास्कचा वापर करावा. अनोळखी ठिकाणी स्पर्श केल्यास हात स्वच्छ धुवावेत. घराबाहेर असताना नाक, तोंड, डोळे अशा ठिकाणी वारंवार स्पर्श करू नये. स्वतःचे आरोग्य नीट सांभाळावे. आपली रोगप्रतिकारक्षमता उत्तम ठेवावी. अर्थातच, यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. म्हणजे कोविडच काय, इतर आजारांपासूनही दूर राहता येते.
हेही वाचा :