पुढारी ऑनलाईन डेस्क : मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही. मी महाराष्ट्रात काम करतो. देशपातळीवर माझा संपर्क नाही. मी दिल्लीत काम करु शकत नाही. माझ्या दिल्लीत ओळखी नाहीत. असं स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज (दि.५) माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, शरद पवार हे निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. आणि कार्यकर्तेही त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. माझ्यासह पक्ष कार्यालयाकडे अनेकांचे राजीनामे आले आहेत. कार्यकर्तेही त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. माझ्यासह अनेकांना वाटतं की, शरद पवार यांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा. पण शरद पवार त्यांच्या मतावर ठाम आहेत. शरद पवारांच्या निर्णयाने आमचे काही नेते निराश झाले आहेत. पण त्यांनी पक्ष पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतला असावा.
पुढे बोलत असताना जयंत पाटील म्हणाले, पक्षामध्ये दोन मतांचे गट आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत शरद पवार यांनी निवृती घेऊ नये अशा विचारांचा एक गट आहे. तर दुसऱ्या मतांचा गट शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बोलत असताना ते म्हणाले की, मी महाराष्ट्रात काम करतो. देशपातळीवर माझा संपर्क नाही आहे. दिल्लीत माझ्या ओळखी नाहीत. मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर अध्यक्ष पदाच्या शर्यतीमधून बाहेर असल्याचं स्वत:च स्पष्ट केलं आहेे.
वज्रमूठ सभा पुढे ढकलन्यावरुन ते बोलताना म्हणाले. वज्रमूठ सभा पुढे जाण्याची कारणे म्हणजे वाढतं तापमान आणि अवकाळी पाऊस हे आहे. या सभा नंतरही होऊ शकतात. येत्या काही दिवसात कोल्हापूर, नाशिक आदी ठिकाणी वज्रमूठ सभा होतील. महाविकास आघाडीवर शरद पवार यांच्या निवृत्तीचा काही परिणाम होईल का यावर ते बोलत असताना म्हणाले की, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीला तडे जाणार नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काम करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा