पुढारी ऑनलाईन डेस्क : विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत जपानच्या सुसाकी यू ला चितपट करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. सुरूवातीपासून दोघींमध्ये चढाओढ सुरू होती. सुसाकी यू हिने पहिला पॉइंट घेतला, पण शेवटच्या क्षणी विनेश फोगटने बाजी पलटावत दोन गुण घेतले. अशाप्रकारे तिने ही लढत ३-१ अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली. (Paris Olympics 2024)
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कठीण ड्रॉ मिळाला. यात आज विनेश समोर महिला फ्री स्टाईलच्या पहिल्या सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळा विश्वविजेती युई सुसाकीचे आव्हान होते. सुसाकी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकाही पराभवाला सामोरे गेलेली नाही. परंतु, याच युई सुसाकीला आपल्या कौशल्यपूर्ण खेळीच्या जोरावर विनेशने धुळ चारली. आता तर सुपर-8 आणि उपांत्य फेरीचे सामने आजच होणार आहेत. (Paris Olympics 2024)
जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती आणि राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती, विनेश इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय कुस्तीपटूंपैकी एक आहे, परंतु ऑलिम्पिक खेळांमधील तिची कामगिरी निराशाजनक आहे.
विनेशने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 48 किलो फ्रीस्टाइल गटात ऑलिम्पिक पदार्पण केले, परंतु गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे तिला उपांत्यपूर्व सामन्यातून माघार घ्यावी लागली. टोकियो 2020 मध्ये महिलांच्या 53 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत जिंकण्याची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या विनेशला पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.